ठाणे :
ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. त्यानंतर राजन विचारे यांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे. (Rajan Vichare on his security) राजन विचारे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र व्यवहार केला आहे. सूडबुद्धीने माझ्या सुरक्षेत कपात केली आहे. त्यामुळे माझ्या जीविताला धोका निर्माण झाला असून दुर्दैवाने काही घडले तर त्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार असतील, (CM and DCM will be responsible if any mishap will take place with me, says Rajan Vichare) असं या पत्रात राजन विचारे यांनी नमूद केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत सत्ता स्थापनेनंतर ठाण्यात नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरून शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने आल्याचे पाहायला मिळालं आहे. मात्र, आता ठाण्यातील ठाकरे गटातील खासदार राजन विचारे यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली आहे. (Security of MP Rajan Vichare) यामुळे विचारे यांनी संताप व्यक्त केला आहे. राजन विचारे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांची भेट घेऊन पत्र व्यवहार केला आहे. कपात केलेली सुरक्षा पुन्हा देण्याची विनंतीही पत्राद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य शासन आणि प्रशासनाकडून संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांवर आणि सूडबुद्धीने तडीपार करणे, एमआरटीपी, प्रक्षोभक भाषण, खोट्या चॅप्टर केस टाकणे, आक्षेपार्ह घोषणा दिल्या बद्दल नोटीस बजावण्यात येत आहेत. तसेच शिंदे गटाकडून शाखा बळकावणे, वाचनालय बळकावणे,वषानुवर्षे आनंद चॅरिटेबल ट्रस्टमार्फत सुरु असलेल्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाच्या जागेवर हक्क सांगणे, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना धमक्या देणे. इत्यादी चिथावणीखोर प्रकार तथाकथित स्वतःला ठाणे जिल्हाप्रमुख समजणाऱ्या नरेश म्हस्के यांच्या निर्देशावरुन होत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची शक्यता आहे. तरी सुद्धा आमच्याकडून संयम ठेवलेला जात असल्याचे या पत्रामध्ये विचारे यांनी नमूद केले आहे.