मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray Birthday) यांनी १४ जून रोजी वाढदिवस साजरा केला. राज ठाकरे सध्या होम क्वारंटाईन असल्यानं त्यांनी कुणाची भेट घेतली नाही. मनसैनिकांनी देखील शुभेच्छा देण्यासाठी ‘शिवतीर्थ’वर येऊ नये, अशी सूचना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली होती. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी, मित्रपरिवाराने सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता भरत जाधवनंही देखील राज ठाकरे यांना इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भरत जाधव पोस्टमध्ये म्हणतो की, मा. राजसाहेब ठाकरे..!! खुप वर्षांपासून ची ओळख. मुळात ते राजकारणात जरी सक्रिय असले तरी जेंव्हा कधी आम्ही भेटतो तेंव्हा ते राजकारण या विषयावर अजिबात बोलत नाहीत. मराठी नाटक… मराठी सिनेमा मध्ये सध्या काय चाललंय. जागतिक सिनेमामध्ये सध्या काय चाललंय यावरच सगळ्या गप्पा असतात.
सगळ्याच कलाकृतींवर त्यांचं चांगलं निरीक्षण असतं. आपण कुठल्या नवनवीन गोष्टी करायला हव्यात हेही ते सुचवतात. मध्यंतरी कोरोना काळात केदार त्यांना भेटायला गेला तेंव्हा लॉकडाऊन आणि त्या सर्व गोंधळात नाट्यगृह आणि चित्रपटगृह काही लवकर उघडण्याची चिन्ह दिसत नाहीत म्हणून पुन्हा टेलिव्हिजन करा हे सुचवणारे ही तेच. त्यातुनच पुढे ‘सुखी माणसाचा सदरा’ ची निर्मिती झाली ज्याद्वारे मी टिव्ही वर पुनरागमन केलं.
मुळात त्यांचा स्वभाव असा आहे की ते चटकन कुणाला जवळ करत नाहीत आणि एकदा केलं तर त्याच्यासाठी हवं ते सर्व करण्यासाठी सिद्ध होतात. वेळोवेळी कुठे चुकत असाल तर कानउघाडणी ही करतात आणि चांगलं काम केलं तर मनापासून कौतुकही करतात. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वास व दिलदार नेत्यास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!