पुणे | राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. आज, २५ जुलै ते २९ जुलैपर्यंत राज्याच्या सर्वच विभागांत पाऊस सक्रिय होणार आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. गुजरातमधील कच्छ परिसरात हवेच्या वरच्या स्तरात वाऱ्याची चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. ओडीशाच्या किनारपट्टीवर बंगालच्या उपसागरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. प्रामुख्याने किनारपट्टीसह, मुंबई, पश्चिम घाटाचा परिसर, विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर जास्त राहणार आहे.
हेही वाचा ” …उद्धव ठाकरेंचं इर्शाळवाडी ग्रामस्थांना आश्वासन; म्हणाले…”
मागील २४ तासांत किनारपट्टीवर अलिबाग ४५.८, डहाणू ३७.५, हर्णे ३१.८, कुलाबा ४४.६, सांताक्रुज १०१.५, रत्नागिरी २७.५ मिमी पाऊस झाला. सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कमी होता. विदर्भात पावसाचा जोर कमी होता. अमरावतीत २३.६, वर्धा १४.६ आणि वाशिममध्ये ४९ मिमी पाऊस झाला.