TOD Marathi

जनतेत जाऊन लोकांना वस्तुस्थिती सांगणं हे काम आपल्याला करायचं आहे. संविधान वाचवण्यासाठी आज आपण उभं झालो नाही तर हा देश वाचणार नाही असं म्हणत राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढत आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाला जोडण्यासाठी काँग्रेस पक्ष 7 सप्टेंबरपासून राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नेतृत्वात भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू होत आहे. देशात प्रेम आणि बंधुता पसरवणे हा या प्रवासाचा उद्देश असल्याचं काँग्रेस (Congress) पक्षाने सांगितलं आहे. आणि म्हणूनच याला भारत जोडो यात्रा असे नाव देण्यात आले आहे. हा प्रवास एकतेची ताकद दाखवण्यासाठी, एकसोबत चालत भारत घडवण्यासाठी आहे, असेही काँग्रेसचे म्हणणे आहे.

राहुल गांधी 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो यात्रा’ सुरू करणार आहेत. मात्र कॉंग्रेसची ही भारत जोडो यात्रा कशी असणार आहे, या यात्रेचे स्वरूप कस असणार आहे. हे आपण जाणून घेणार आहोत.

भारत जोडो यात्रेत दररोज 25 किलोमीटरचा पायी प्रवास असणार आहे आणि 3500 किलोमीटरचा हा प्रवास 150 दिवसांत पूर्ण केला जाईल. यादरम्यान अनेक ठिकाणी सभांचे आयोजनही केले जाणार आहे. देशाला जोडण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे. जेव्हा ही यात्रा निघेल तेव्हा इतिहास लिहिला जाईल, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशी 3500 किमी लांबीची भारत जोडी यात्रा आहे.
काँग्रेसची ही भारत जोडो यात्रा म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरुद्ध वातावरण निर्माण करण्याची तयारी असल्याचंही बोललं जात आहे. या यात्रेनिमित्त काँग्रेस पक्ष पुन्हा मजबूत करणे आणि संपूर्ण देशभरात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करणे तसेच पक्षात आणखी तरुण कार्यकर्त्यांचा समावेश व्हावा यासाठी कॉंग्रेसचे प्रयत्न असतील. कॉंग्रेसच्या या यात्रेचा चेहरा अर्थातच राहुल गांधी असणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणूनही काँग्रेस एकप्रकारे राहुल गांधी यांना या माध्यमातून प्रोजेक्ट करत असल्याची चर्चा आहे.

राहुल गांधींच्या नेतृत्वात होणारी भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातुन तब्बल 16 दिवस प्रवास करणार आहे. यामध्ये 7 लोकसभा मतदारसंघ आणि 16 विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा जाणार आहे. त्याचबरोबर दहा ठिकाणी सभा होणार आहेत तर दोन ठिकाणी मोठ्या सभा होणार असल्याची देखील माहिती आहे. कपिल सिबल, गुलाम-नबी आझाद यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर पुन्हा एकदा देशभर पक्षाला उभारी देण्यासाठी काँग्रेसची ही भारत जोडो यात्रा अतिशय महत्त्वाची असणार आहे. राहुल गांधींसह देशभरातील काँग्रेस नेते देखील यामध्ये सहभागी होणार आहेत. गेल्या काही वर्षातील कॉंग्रेस पक्षाचा हा सर्वात मोठा कार्यक्रम असणार आहे.