टिओडी मराठी, पुणे, दि. 10 मे 2021 – महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढणार आहे, असे आता संकेत मिळत आहेत. त्यामुळे पाण्यातही आता 15 मे नंतर कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांनो, सर्व कामे सकाळी 11 च्या आत उरका. दुपारपासून कडक लॉकडाऊन अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे.
पुण्यात लॉकडाऊन करण्याचा गांभीर्याने विचार करावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने नुकतीच राज्य सरकारला केली होती. त्यामुळे पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या चर्चेत आलीय. संपूर्ण लॉकडाऊन करण्याची वेळ येण्याअगोदर खबरदारी घ्यावी, या हेतूने शहर पोलिसांनी आता नाकाबंदीची व्याप्ती वाढविलीय.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता तसेच सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे व इतर वरिष्ठ अधिकारी स्वत: रस्त्यावर उतरुन दररोज शहरातील विविध भागाला भेटी देऊन नाकाबंदीची पाहणी करत आहेत. उत्तमनगर, स्वारगेटसह शहरातील काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पाहणी केली आहे.
सर्वत्र नाकाबंदी चांगली सुरु असून काही ठिकाणी बंदोबस्तात काही उणिवा दिसून आल्या आहेत. त्याबाबत त्यांनी सूचना केल्या असून सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना मोकळीक दिलीय. असे असले तरी नागरिकांनी आपल्या परिसरात वाहनांचा वापर कमी करावा.
सकाळी नागरिक वेगवेगळी कारणे सांगतात. त्यातून रस्त्यावर पोलीस आणि नागरिक यांच्यात काही वेळा वादाचे प्रसंगही उद्भवतात. दुपारपासून रस्त्यावर आलेल्या प्रत्येक नागरिकांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे.
नागरिकांनी आवश्यकता असेल तर घरातून बाहेर पडावे. दुपारी १२ वाजल्यापासून रस्त्यावर येणार्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.