राज्यात आधीच विविध वक्तव्यावरून वातावरण तापलेलं असताना मंगलप्रभात लोढा यांनी एक वक्तव्य केलंय. (Statement of Mangalprabhat Lodha in Shivpratap Din program) ज्याप्रमाणे आग्र्याहून शिवाजी महाराजांची सुटका झाली होती, तशीच एकनाथ शिंदे यांची सुटका झाली, असं वक्तव्य त्यांनी केलं. किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. हे वक्तव्य करताना अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला त्यांनी औरंगजेबाची उपमा दिली.
मंगलप्रभात लोढा यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह आमदार अमोल मिटकरी यांनीही अशा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लोकांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.(Ajit Pawar, Aditya Thackeray, Amol Mitkari reacted on controversial statements)
विश्वासघातकीपणे स्थापन झालेल्या सरकारची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याशी करणे हे पुन्हा भाजपच्या राजकीय दिवाळखोरीचे प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा दररोज अनादर होत असून असंवैधानिक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गप्प आहेत. थोडी लाज बाळगा! अशी संतप्त प्रतिक्रीया खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केली आहे. (Priyanka Chaturvedi on controversial statements)
मंगलप्रभात लोढा नक्की काय म्हणाले?
“छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं. परंतु शिवरायांनी स्वत:साठी नाही तर हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन अतिशय चतुराईने तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले. पण एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी तिकडून (शिवसेना आणि मविआमधून) बाहेर पडले”, असं म्हणत मंगलप्रभात लोढा यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मविआची तुलना औरंगजेबाशी केली.