TOD Marathi

भाजपमधील देवेंद्र फडणवीस यांच्या अतिउत्साही समर्थकांमुळेच त्यांना तोटा सहन करावा लागला, (Devendra Fadnavis has to loss because of bjp supporters) असं मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

भाजप कार्यकर्त्यांच्या तयार झालेल्या प्रतिमेमुळेच फडणवीस यांच्या नेतृत्वाला ब्रेक लावण्याचे काम राष्ट्रीय पातळीवरून करण्यात आल्याची शक्यता त्यांनी बोलून दाखविली.

एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी गुरुवारी शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांना शपथ घेण्याचे आदेश थेट दिल्लीवरून देण्यात आले. दिल्लीतील या आदेशानंतर याबाबत अनेक तर्कवितर्क वर्तविले जात असतानाच, ‘हा निर्णय अचानक घेण्यात आला नव्हता. तर तो जाणीवपूर्वक घेतला गेला’, असं मत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, ‘राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेला चांगलं यश मिळत आहे. शिवसेनेचे वाढते वजन लक्षात घेता भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची धुरा दिली असावी. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देणे आणि शिवसेनेचे वजन कमी करणे हेदेखील कारण असावे.’ तसेच मराठा समाज डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला गेल्याची शक्यताही चव्हाण यांनी बोलून दाखविली.

लवकरच खाते वाटपादरम्यान एकनाथ शिंदे यांना नाराजीचा सामना करावा लागणार असल्याचे सांगत चव्हाण यांनी त्यांना सबुरीचा सल्लाही दिला.

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काही दिवसांपूर्वीच ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत आगामी निवडणुकीत एकत्र जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. तर, पुढील भूमिका ठरविण्यासाठी लवकरच एकत्रितपणे निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितल्याचे चव्हाण म्हणाले.