TOD Marathi

मुंबई:
मनसेचे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांना अटक पूर्व जामीन मंजूर झालेला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या ठपका ठेवत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजी पार्क परिसरातून दोघेही बेपत्ता होते आणि त्यानंतर अटकपूर्व जामीना करीता त्यांचा अर्ज दाखल केला होता. यावर आता निर्णय झालेला आहे आणि दोघांनाही म्हणजेच संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे.

मनसेनं राज्यात मशिदीवरील भोंग्याविरोधात आंदोलन पुकारलं होतं. त्यावेळी पोलिसांनी अनेक मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवल्या होत्या. मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडेसहित अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस पाठवल्या होत्या. त्यादिवशी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना पकडण्याची मोहीम सुरू केली होती. याच आंदोलनाच्या दिवशी मनसेचे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांना पोलिसांकडून ताब्यात घेतले जात होते, त्यावेळी दोन्ही नेत्यांनी वाहनानं पळ काढला. त्यावेळी त्यांच्या वाहनाच्या धक्क्यानं एक महिला पोलीस जखमी झाली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यामुळे दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. सदर घटना ४ मे रोजी राज ठाकरे यांच्या घराबाहेर घडली होती. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी कोर्टात धाव घेतली होती. आज कोर्टाकडून त्यांना सशर्त अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

गेले काही मुंबई पोलिस संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा शोध घेत होते. आता अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी माध्यमांसमोर येतात का हे बघावे लागणार आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केलेला आहे.