टिओडी मराठी, दिल्ली, दि. 21 जून 2021 – राजकीय रणनितीकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार सध्या दिल्लीमध्ये असून तिथे ते राष्ट्रीय नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. या दरम्यान प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यातील भेटीमुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावरील राजकारणामध्ये खळबळ माजली आहे.
काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर सुमारे साडेतीन तास भेट घेतली होती. देशातील एकूण राजकीय परिस्थिती, नरेंद्र मोदींविरोधातील जनतेच्या मनातील रोष, त्यातील निर्माण झालेली तिसऱ्या आघाडीची शक्यता आदी विषयांवर तेव्हा सविस्तर चर्चा झाल्याची कुणकुण होती.
या दरम्यान, शरद पवार यांचे अन्य राज्यातील प्रादेशिक पक्षांसोबत चांगले संबंध आहेत. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, मायावती, लालूप्रसाद यादव, चंद्राबाबू नायडू हे पवार यांच्या ऐकण्यातील आहेत. त्यामुळे आगामी काळात देशातील सर्व विरोधकांची एकत्रपणे मोट बांधून पवार भाजपला चारीमुंड्या चित करणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
जाणून घ्या, कोण आहेत प्रशांत किशोर :
प्रशांत किशोर हे निवडणूक रणनीतीतज्ञ म्हणून ओळखले जात आहेत. आत्तापर्यंत त्यांनी पंजाब, बिहारमध्येही स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम पाहिलं आहे. पश्चिम बंगालमधील अटीतटीच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून देण्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती.