टिओडी मराठी, पुणे, दि. 21 ऑगस्ट 2021 – पोलिस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना त्यांचे ईमेल आयडी, पासवर्ड आणि विपल्प अद्ययावत करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून मुदतवाढ दिली आहे. हि मुदतवाढ सर्व उमेदवारांना 22 ऑगस्टपर्यंत आहे.त्यानुसार, उमेदवारांनी रविवारपर्यंत आवश्यक बदल करून माहिती अद्ययावत करावी, असे आदेश पुणे पोलिस प्रशासनाकडून दिले आहेत.
पुणे पोलिस दलात ‘पोलिस भरती 2019’ साठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होणार असून या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी अर्जही भरलेत. 5 ऑगस्ट रोजी प्रशासनाने या भरती प्रक्रियेसंदर्भात शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात उमेदवारांना त्यांचा पासवर्ड आणि विकल्प निवडण्याबाबत कळविले होते. पासवर्ड सर्व उमेदवारांनी बदलणे आवश्यक आहे. अन्यथा ते पुढील भरती प्रक्रियेमधील आपले आवेदनपत्र उघडू शकणार नाहीत.
तसेच एसईबीसीच्या उमेदवारांना अराखीव (खुला) किंवा ईडब्ल्युएस यापैकी एक विकल्प देणे आवश्यक आहे. परंतु काही उमेदवार त्यांचे ईमेल आयडी विसरलेत किंवा अन्य कारणास्तव त्यांचा ईमेल आयडी हरवलाय.
अशा प्रकारच्या तक्रारी काही उमेदवारांकडून पोलिस प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. त्याची गांभीर्याने दखल घेऊन, ज्या उमेदवारांचे ईमेल आयडी विसरले असतील किंवा लक्षात नसतील किंवा अन्य कारणास्तव उपलब्ध नसतील, त्यांचा ईमेल आयडी अद्ययावत करण्यासाठी तसेच विकल्प देण्यासाठी सर्व उमेदवारांना 22 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून दिली आहे.
अर्ज भरलेल्या उमेदवारांनी www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘पोलिस भरती 2019′ येथे क्लिक करावे. त्यानंतर पोलिस आयुक्त पुणे शहर यांच्या संकेतस्थळावर जाऊन विकल्प द्यावा किंवा ईमेल आयडी, पासवर्ड बदल करून घ्यावा, असे आवाहन शहर पोलिस दलाच्या आस्थापना विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण यांनी केलं आहे.