कोपनहेगन: पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या युरोप दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. जर्मनीनंतर आता दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी डेन्मार्कला पोहोचले आहेत. विमानतळावर त्यांचे जंगी स्वागतही करण्यात आलं आहे. डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी स्वतः विमानतळावर येऊन पंतप्रधान मोदींच स्वागत केलं आहे.
पंतप्रधान मोदी येथे भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. विमानतळावर जोरदार स्वागत केल्यानंतर पंतप्रधान मोदी डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनला पोहोचले. जिथे ते डेन्मार्कच्या पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर दोन्ही देशांकडून संयुक्त निवेदनही जारी केले जाईल. पंतप्रधान मोदी येथे भारत-डेन्मार्क बिझनेस फोरमला संबोधित करतील.
तसेच याआधी पंतप्रधान मोदींनी जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांची भेट घेतली. यानंतर, संयुक्त निवेदनात पंतप्रधान मोदींनी रशिया-युक्रेन युद्धापर्यंत ते कोरोना महामारीचा उल्लेख केला. आपल्या जर्मनी दौऱ्याबाबत पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून म्हटले की, “माझी जर्मनी भेट अतिशय यशस्वी झाली आहे. चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांच्याशी विविध मुद्द्यांवर तसेच आंतरसरकारी सल्लामसलतांवर व्यापक चर्चा झाली. मला व्यावसायिक प्रतिनिधी आणि भारतीय समुदायातील लोकांशी संवाद साधण्याची एक चांगली संधी मिळाली.
दरम्यान पंतप्रधान मोदींचा लॉकडाऊन नंतरचा हा पहिलाच युरोप दौरा आहे. मोदी दौऱ्यात विवीध राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. शेवटच्या टप्प्यावर मोदी फ्रान्सला भेट देणार असून राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचीही भेट घेणार आहेत.