टिओडी मराठी, दि. 30 मे 2021 – एकीकडे कोरोनाचा फैलाव आणि दुसरीकडे वाढती महागाई यामुळे जनता हैराण झाली आहे. आता निवडणूक नसल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत आहेत. पेट्रोलने शंभरी पार केली असून डिझेल देखील भडकलं आहे. त्यामुळे सामान्यांना महागाईचा मोठा झटका सहन करावा लागत आहे. हे सरकार काय करतंय? असा प्रश्न सामान्यांना पडत आहे.
मुंबई, पुणेसह महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्हे आणि देशात अनेक ठिकाणी पेट्रोल शंभरीच्या पुढे गेलं आहे, तर डिझेलचीही सतत दरवाढ सुरूय. इंधन दरवाढीसह इतर वस्तूंचेही भाव वाढलेत. महागाईचा अकरा वर्षांतील रेकॉर्डब्रेक झाला आहे, असे आढळून आले आहे.
पश्चिम बंगालसह चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर एक दिवसाआड इंधन दर वाढत आहेत. 4 मे 2021 पासून 14 वेळा इंधनाचे दर वाढवले आहेत. या काळामध्ये पेट्रोल प्रतिलिटर 3.28 रुपये तर, डिझेल 3.88 रुपयांनी महागले आहे.
डिझेल महाग झाल्याने त्याचा थेट परिणाम मालवाहतुकीवर होत आहे. पर्यायाने फळे, भाज्या, धान्य, खाद्यतेल यात मोठी वाढ होते. त्यामुळे याचा फटका मध्यमवर्गीय व सामान्य जनतेला बसत आहे.
एलपीजी सिलिंडर 810 रुपयांवर गेला आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षीपासून सबसिडीही बंद केल्यामुळे घरातील किचनचे बजेट कोलमडले आहे.
पेट्रोल-डिझेल एवढे महाग का?
कोरोनाची लाट ओसरल्यानंतर अमेरिका, ब्रिटनसह युरोपातील अनेक देशांत अनलॉक होत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलला मागणी वाढलीय. ही मागणी वाढली तरी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 66 ते 68 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत आहेत. मग, 70 डॉलर्स प्रति बॅरलपेक्षा कमी कच्चे तेल असताना भारतात पेट्रोल-डिझेल एवढे महाग का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुन्हा शनिवारी पेट्रोल 28 पैसे तर डिझेल 26 पैशांनी महागले. सध्या मुंबईत पेट्रोलचा दर 100 रुपये 19 पैसे, तर डिझेल 92 रुपये 17 पैसे प्रतिलिटर असा झालाय. तर पुण्यात पेट्रोल 100.15 रुपये झाले असून डिझेल 90.44 रुपयांवर गेले आहे.