मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून फरार झाले असावेत असा संशय तपास यंत्रणांना आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ऑगस्ट महिन्यात अनेकदा समन्स बजावूनही परमबीर सिंग यांचा कुठेही पत्ता नाही. यामुळे परमबीर सिंग अटकेच्या भीतीपोटी देश सोडून फरार झाले असावेत असा संशय एनआयए आणि राज्य सरकारने व्यक्त केला आहे.
एनआयएने अँटिलिया स्फोटकं तसंच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात परमबीर सिंग यांना समन्स बजावलं होतं. सचिन वाझेच्या अटकेनंतर एप्रिल महिन्यात एनआयएने सर्वात प्रथम परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला होता. एनआयएने नुकतंच दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंग यांचाही यात सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्याचा उल्लेख आहे.
खंडणीचे गुन्हे दाखल झाल्यावर चौकशीला प्रतिसाद न दिल्याने ठाणे पोलिसांकडूनही लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. मात्र परमबीर सिंग नक्की आहेत कुठे, अशी चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांकडून कारवाई होईल या भीतीमुळे परमबीर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी विदेशात पलायन केल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे.