TOD Marathi

मुंबई: दे धक्का या मराठी विनोदी चित्रपटाने १३ वर्षांपूर्वी रसिकांना चांगलंच हसवलं होतं. आता चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी अशी की या चित्रपटाचा दूसरा भाग सुद्धा प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बद्दलची सविस्तर माहिती अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.

मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव अशा दिग्गज कलाकारांचा या चित्रपटात समावेश होता. आता दुसऱ्या भागाची प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी म्हणजे १ जानेवारी २०२२ ही तारीख प्रदर्शनासाठी जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे.

अमेय खोपकर यांनी ट्विट करून याविषयी माहिती दिली आहे. थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, अशा वाक्याने त्यानं ही माहिती दिली आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात आता दे धक्काची कलाकार मंडळी थेट इंग्लंडमध्ये धमाल करताना दिसणार आहेत. या आधी आलेल्या दे धक्काने प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच राज्य केले होते. त्यामुळे आता प्रेक्षक देखील या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.