टिओडी मराठी, मुंबई, दि. 23 जून 2021 -महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी भेट घेऊन 3 मागण्या केल्या आहेत. यामध्ये राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे. त्यामुळे अधिवेशनाचा काळ दोन दिवसाऐवजी पूर्ण अधिवेशन घ्यावे, विधानसभा अध्यक्षांची रखडलेली निवडणूक घ्यावी आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देऊ नका, अशा मागण्या भाजपने राज्यपालांकडे केल्या. त्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, ओबीसी आरक्षण सरकारच्या नाकर्तेपणामुळ गेलंय. मागील 40-50 वर्षात पहिल्यांदा ओबीसींना राजकीय आरक्षण या सरकारने ठेवलं नाही.
आरक्षणाचा मार्ग निघेपर्यंत निवडणुका घेऊ नका, असे सरकारने सांगितलं होतं. पण, त्या निवडणुका जाहीर झाल्यात. राज्यापालांना विनंती केली आहे की, या निवडणुका पुढे ढकला. राज्य सरकारने ओबीसींबाबत विश्वासघात केलाय.
‘या’ मंत्र्यांनी राज्य सरकारला निवडणुका पुढे घ्यायला भाग पाडावे. आम्ही आंदोलन करणार आहोत, निवडणुका जर घेणार असाल तरीही भाजप या जागांवर केवळ ओबीसी उमेदवार देणार आहे. निवडणूक जिंकलो हरलो काहीही होवो, ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप पाठपुरावा करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.