कोल्हापूर: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. त्याच सोबत किरीट सोमय्यांनी २७०० पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत. मुश्रीफ कुटुंबाने १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सोमय्यांच्या विरोधात चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. मात्र अशा परिस्थितीत देखील सोमय्यांनी घोरपडे कारखान्यासह कागल मतदारसंघात काही ठिकाणीही भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना कितीही सुरक्षा दिली तरी कोल्हापूरी हिसका दाखवू, असे जाहीर आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहे.
मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप म्हणजे निव्वळ स्टंट आहे. हिंमत असेल तर सोमय्या यांनी जनतेच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे आव्हान कोल्हापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांच्या पत्रकार परिषदेमध्ये दिले. सोमय्या सोमवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याचे समजते. त्या पार्श्वभूमीवर आम्ही जनता, कार्यकर्ते, सरसेनापती साखर कारखान्याचे सभासद शेतकरी, हजारो निराधार माता-भगिनी आणि रुग्ण कागलमध्ये जमत आहोत. आम्हाला भेटूनच त्यांनी पुढे जावे, असेही आव्हान त्यांनी दिले.