मुंबई :
चंद्रशेखर बावनकुळे रात्रंदिवस काम करणारा कार्यकर्ता आहे. आपल्या कामाने वंचित पीडितांना त्यांनी नेहमी न्याय दिला. जनतेचं प्रेम मिळवलं. घरची गरिबी असताना त्यांनी त्या परिस्थितीतही स्वत:चा, कुटुंबाचा विचार न करता पक्षाचं काम केलं. म्हणून देवेंद्र फडणवीस जर दिल्लीत गेले तर चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी आहे, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं होतं. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सत्काराचं निमित्त असलं तरी नितीन गडकरी यांना भविष्यातील घडामोडीचा सूर गवसला होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण नितीन गडकरी यांच्या भाषणानंतर फक्त चार दिवसात देवेंद्र फडणवीसांची केंद्राच्या राजकारणात एंट्री झाली आहे. भाजपने केंद्रीय निवडणूक समिती आणि केंद्रीय संसदीय समिती तयार केली आहे.
भाजपचे अंतिम निर्णय घेणारी जी मोजक्या नेत्यांची निवडणूक समिती आहे, त्यात देवेंद्र फडणवीसांचा समावेश आहे, महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये नितीन गडकरी यांना देखील स्थान नाही. त्यामुळे हे स्थान मिळवलेले फडणवीस हे महाराष्ट्रातले एकमेव भाजपचे नेते आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. यात देशभरातील भाजपाच्या १५ बड्या नेत्यांच्या समावेश करण्यात आलाय.
देवेंद्र फडणवीसांनी २०१४ च्या आधी भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटनेत काम केलं आहे, त्यानंतर २०१४ ला राज्यात भाजपची सत्ता आली, २०१४ ते २०१९ अशी पाच वर्षे फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. दरम्यान त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना पक्षात घेत संघटन आणखी मजबूत केलं. २०१९ ला गेलेली सत्ता २०२२ मध्ये पुन्हा मिळवली आणि याच देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या संघटन कौशल्याची पावती या नियुक्तीच्या निमित्ताने केंद्रीय नेतृत्त्वाने दिली आहे.