टिओडी मराठी, नाशिक, दि. 5 सप्टेंबर 2021 – दिवसेंदिवस पेट्रोलियम कंपन्यांकडून गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ होत आहे. याचा निषेध करत राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोवऱ्या भेट पाठवत महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय.
मागील दिड वर्षापासून देशात कोरोनामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर अनेकांचे रोजगार बुडाले. अशा कठीण परिस्थितीमध्ये महागाई वाढत असल्याने सामान्य माणसाला जीवन जगणे नकोसे झालंय. महागाईचा आलेख दिवसागणिक वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गरिबांच्या जीवनाशी काही देणे-घेणे दिसत नाही. देशाचा विकास दाखवताना सामान्य जनतेचे जीवन मात्र पंतप्रधान यांनी भकास करून टाकले.
यावेळी भामरे म्हणाल्या, १ जानेवारी २०२१ पासून आजपर्यंत घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत सुमारे रूपये १९० ची दरवाढ केली असून अनुदान मात्र बंद केले आहे. केंद्रामध्ये भाजपचे सरकार सत्तेत येण्याअगोदर १ मार्च २०१४ रोजी मिळणारे गॅस सिलेंडर रूपये ४१० किमतीचे आज रूपये ९०० पर्यंत जाऊन पोहोचले. यामुळे सर्व सामान्य महिलांचे बजेट संपूर्णपणे कोलमडलं आहे. महिलांनी वारंवार आंदोलन करूनही केंद्रातील सरकार मात्र ढिम्म बसून गंमत पाहतांना दिसते.
गॅस सिलेंडरची दरवाढ असह्य होत असल्याने केद्रांतील भाजप सरकारचा निषेध करीत आज पोस्टामध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोवऱ्यांचे पार्सल पाठविताना राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराध्यक्षा अनिता भामरे, पूर्व विभाग अध्यक्ष सलमा शेख, पश्चिम विभाग अध्यक्ष योगिता आहेर, पंचवटी विभाग अध्यक्ष सरीता पगारे, नासिक रोड विभाग अध्यक्ष रूपाली पठारे, शहर पदाधिकारी शाहिन शेख, सलमा शेख आदी महिला उपस्थित होत्या.