टिओडी मराठी, मुंबई, दि. 6 सप्टेंबर 2021 – गर्दी होईल असे कार्यक्रम न घेण्याचे आवाहन राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि संघटनांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केले आहे. त्यानंतर गर्दी होईल अशा कार्यकमांचे आयोजन न करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे, अशी माहिती मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
गर्दी टाळण्यासाठी पाऊले टाकली पाहिजेत, ही आपल्या पक्षाची भूमिका आहे, असेही ते म्हणाले आहेत. पक्षाच्या वतीने गर्दी होईल, असा एकही राजकीय कार्यक्रम घेण्यास मनाई केली आहे. पक्षाच्या माध्यमातून तसे कार्यक्रम होणार नाहीत, ही पक्षाची भूमिका आहे, असे नवाब मलिक यांनी म्हंटलं आहे.
सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेऊन गर्दी करू नका किंवा एखाद्या कार्यक्रमातून गर्दी होईल असा कार्यक्रम घेऊ नका. थोडे दिवस थांबा, असा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कॅबिनेटमध्ये केला आहे. तसेच तशा सूचना तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी पाऊले टाकली पाहिजेत, ही पक्षाची भूमिका आहे, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.