TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 6 सप्टेंबर 2021 – अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे, असा दावा याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी केलाय. आता लवकरच अनिल देशमुखांना अटक होऊ शकते, असा दावाही जयश्री पाटील यांनी केलाय. पण अद्याप यांदर्भात कोणतीही अधिकृत माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांकडून दिलेली नाही.

अनिल देशमुख यांची मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरुय. ईडीने याप्रकरणी वारंवार अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत. अनिल देशमुख यांनी याप्रकरणी ईडीचे समन्स रद्द करावे, या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

पण, न्यायमूर्ती रेवती डेरे यांनी देशमुख यांच्या याचिकेवर कोणतीही सुनावणी करण्यास नकार दिला. त्यामुळे दुसऱ्या खंडपीठासमोर अनिल देशमुखांच्या याचिकेवर सुनावणी केली जाणार आहे. अशात आता अॅड. जयश्री पाटील यांनी ईडीने अनिल देशमुखांविरोधात लूक आऊट नोटीस जारी केल्याचे म्हटले आहे.

आतापर्यंत ईडीने अनिल देशमुख यांना पाच वेळा समन्स बजावले आहे. पण ते एकदाही चौकशीसाठी ईडीसमोर हजर झालेले नाहीत. अनिल देशमुखांनी कायद्यानुसार, उपलब्ध पर्यायांचा विचार करत आहेत, असा दावा करत हजर राहण्यास नकार दिला होता.

अनिल देशमुख यांना मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणातील ईडीच्या कारवाईपासून अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता.