टिओडी मराठी, पिंपरी चिंचवड, दि. 27 मे 2021 – दोन खुनी हल्ले केल्याप्रकरणी फरार असलेल्या पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुत्राला अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी रत्नागिरी येथून अटक केली आहे. सिद्धार्थ बनसोडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आज त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे.
सिद्धार्थ हा पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलगा असून 13 मे रोजी त्याच्या विरुद्ध पिंपरीतील AG इन्व्हायरो इन्फ्रा या कंपनीत जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी तसेच आमदाराला बोलण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीलाही जबर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले होते.
राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटनाही याच दरम्यान घडली होती. आपली दोन माणसं कामावर घेण्यावरून आमदार बनसोडे यांचे AG एन्व्हायरो कंपनीचा मॅनेजर तानाजी पवार यांच्यासह बोलणं सुरू होतं. मात्र, बोलण्याचं रूपांतर वादात झालं तेव्हा बनसोडेंचा मुलगा सिद्धार्थ याने तानाजी पवार याला शोधण्यासाठी कंपनीमध्ये दाखल झाला.
मात्र, तिथे पवार न मिळाल्याने त्याने इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची तक्रार कंपनीकडून दाखल केली होती. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी तानाजी पवार आमदार बनसोडे यांच्या कार्यालयात गेला होता. मात्र, तिथे दोघांत वाद झाला आणि AG इन्व्हायरो कंपनीचा मॅनेजर असलेल्या तानाजी पवारने आमदार बनसोडेवर गोळ्या झाडल्या. यादरम्यान उपस्थित असलेल्या सिद्धार्थ आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी तानाजी पवारला बेदम मारहाण केल्याची तक्रारही केली होती.
या दोन्ही प्रकणात सिद्धार्थ आणि त्याच्या कार्यकर्त्यांविरुद्ध खुनाचा प्रयत्न अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर सिद्धार्थ बनसोडे फरार झाला होता. मात्र, अखेर बुधवारी निगडी पोलिसांनी त्याला शोधलं आणि आरोपी सिद्धार्थच्या चार साथीदारासह त्याला रत्नागिरीतून अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त इप्पक मंचर यांनी दिलीय.
याप्रकरणी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर राजकीय दबाव असल्याचा आरोप केला जात होता. मात्र, आपण कुठल्याही दबावाला बळी न पडता अगोदर तक्रारीनुसार, आमदार पुत्राविरुद्ध गुन्हे दाखल केले आणि त्याचा शोध घेऊन त्याला अटकही केल्याचे कृष्ण प्रकाश यांनी म्हटले आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे, याचा तपास केल्यानंतर जे दोषी आढळतील त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही प्रकाश यांनी म्हटलं आहे.