TOD Marathi

टिओडी मराठी, लखनऊ, दि. 28 जुलै 2021 – राष्ट्रवादीने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरु केलेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षाबरोबर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये मैदानात उतरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेशच्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाबरोबर युती करेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस के. के. शर्मा आणि प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी मंगळवारी लखनऊ येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

लखनऊमध्ये मंगळवारी के. के. शर्मा होते. शर्मा यांनी उत्तर प्रदेश प्रेस क्लबमध्ये माध्यमांना सांगितले की, उत्तर प्रदेशामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी मुख्य विरोधी पक्ष समाजवादी पक्षाच्या नेतृत्वात सर्व विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केलीय. यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसारखे उत्तर प्रदेशामध्ये भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. येथे समाजवादीसह आम्ही एकत्र निवडणुका लढवून भाजपला रोखू, असे के.के शर्मा यांनी म्हंटलं आहे.

शर्मा म्हणाले की, पक्षप्रमुख शरद पवार यांनी स्पष्टपणे म्हंटलं आहे की, उत्तर प्रदेशातील तरुण आणि शेतकऱ्यांचा आवाज राष्ट्रवादीला उठवावा लागेल कारण तेथील भाजप सरकार लोकशाहीला धोका निर्माण करत आहे.

जो कोणी आवाज उठवत आहे, त्यांच्यावर कारवाई करून आवाज दडपला जात आहे. जबरदस्तीने धर्मांतर करणे चुकीचे आहे, परंतु जर कोणी स्वत: च्या इच्छेनुसार धर्मांतर करत असेल तर त्याला हरकत नसावी.

त्यासह प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस १ ऑगस्टपासून राज्यभर राज्य वाचवा, संविधान वाचवा आंदोलन सुरू करणार आहे. ज्यात शेतकरी आणि युवकांवर लक्ष केंद्रीत केलं जाईल.