टिओडी मराठी, पुणे, दि. 7 सप्टेंबर 2021 – पुण्यातील मेट्रो स्थानकांना महापुरूषांची नाव द्या, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्याकडे एका पत्राद्वारे केलीय.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहूचर्चित असलेल्या पुणे मेट्रोला हिरवा कंदील दाखवत होता. त्यानंतर पुणे मेट्रोची ट्रायल रन व्यवस्थित पार पाडली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मेट्रोचा पाहणी दौरा केला. पाहणी दौऱ्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि भाजप यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली होती. अशात संभाजी ब्रिगेडने हि मागणी केली आहे.
पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जात आहे. पुणे शहराला सांस्कृतिक, परिवर्तनवादी तसेच पुरोगामी चळवळीचा वारसा लाभलाय. त्यामुळे महापुरूषांचा वैचारिक आणि ऐतिहासिक वारसा आपण जपलं पाहिजे. त्यांच्या विचारांतून प्रेरणा मिळावी, आपण त्यांचे वैचारिक ठेवा जपन्याचे काम केलं पाहिजे. भारतातील 13 महापुरूषांची मेट्रो स्टेशनला नावं देऊन त्यांचा सन्मान करावा, असेही संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मल्हारराव होळकर, राजमाता अहिल्याबाई राणी होळकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, लहूजी वस्ताद साळवे, दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे, सरसेनापती वीर बाजी पासलकर, महादजी शिंदे आणि शिवशाहीर अण्णा भाऊ साठे या महापूरूषांची नावं पत्रात संभाजी ब्रिगेडने सुचवली होती.
पुणे मेट्रोमध्ये प्रवास करताना प्रवाशांना तिकीट दरातही सूट दिली आहे. तसेच प्रवाशांना थेट सायकल घेऊनही मेट्रोत प्रवास करता येणार आहे. त्यासाठी वेगळं तिकीट काढण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे पुणे मेट्रो प्रत्यक्षात ग्राहकांच्या सेवेत कधी दाखल होते, याची प्रतिक्षा पुण्यातील नागरिक आता करत आहेत.