गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेश उत्सवात कोकणात (Konkan) जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या खूप मोठी असते. मात्र कोकणात जाताना चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावरुन (Mumbai Goa Highway) खडतर प्रवास करावा लागतो. कारण रस्त्यावरील अनेक खड्डे (Potholes) आणि महामार्गाचं चौपदीकरण. परंतु कोकणात जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आता मुंबई-गोवा हायवेवरील डागडुजीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
रस्त्यांची दूरवस्था झाल्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे आज मुंबई गोवा हायवेच्या (Mumbai Goa Highway) पाहणी दौऱ्यावर आले आहेत. पनवेलनजीकच्या पळस्पे येथून हा दौरा सुरू झाला आहे. या दौऱ्यादरम्यान ते या संपूर्ण महामार्गावरील कामाची पाहणी करणार आहेत. रवींद्र चव्हाण यांनी स्वत: कामगारांना सूचना देत मुंबई गोवा महामार्गावर खड्डे भरणीला सुरुवात केली आहे.
गेली 11 वर्ष या महामार्गाचं काम रखडलं आहे. तसेच 2018 पासून मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिकाही प्रलंबित आहे. यादरम्यान सरकारं बदलली, मंत्री बदलले मात्र रस्त्याची दुरावस्था जैसे थेच आहे. मुंबई गोवा महामार्गावरील रायगडच्या पहिल्या टप्यातील काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे. पळस्पे ते इंदापूर या पट्यात तर रस्त्याची अक्षरश: चाळण झालीय. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात इथं दर आठवड्याला खड्डे भरणी करावी लागते. दरवर्षीप्रमाणे यंदाही ती सुरू आहे.