लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ते ‘नेताजी’ या नावाने प्रसिद्ध होते. मुलायम सिंह यादव यांच्या निधनाने शोक व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात मुलायम सिंह यादव यांच्यावर उपचार सुरू होते. मुलायम सिंह यांना युरिन इन्फेक्शनचा त्रास होता. त्यातच ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने ते जीवनरक्षक औषधांवर होते. गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या मोठ्या टीमद्वारे त्यांच्यावर उपचार केले जात होते. मुलायमसिंह यादव यांना महिनाभराहून अधिक काळ रुग्णालयात दाखल करूनही त्यांची प्रकृती गेल्या आठवडाभरात झपाट्याने खालावली होती. प्रकृती खालावली असल्याने त्यांचा मुलगा आणि सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव हे मेदांता रुग्णालयात उपस्थित होते.