अमरावतीत एका 19 वर्षीय हिंदू तरुणीचे अपहरण झाल्याचा आरोप आहे. संशयित आरोपीला राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. मात्र, मुलीचा अजूनपर्यंत पत्ता लागलेला नाही आणि त्यामुळे अमरावतीत भारतीय जनता पक्ष, (BJP Amravati) विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. खासदार नवनीत राणादेखील (MP Navneet Rana) पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या आणि चांगल्याच आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळाल्या. मी काही माहिती विचारण्यासाठी फोन केला असता माझा फोन का रेकॉर्ड केला? असं म्हणत नवनीत राणा यांनी पोलिसांना चांगलंच फैलावर घेतलं.
एखाद्या गोष्टीची चौकशी करण्यासाठी फोन केल्यानंतर लोकप्रतिनिधींचा फोन तुम्ही कसा काय रेकॉर्ड करू शकता? असं म्हणत नवनीत राणा यांनी पोलिसांना चांगलंच धारेवर धरलं. जोपर्यंत पोलीस आयुक्त या ठिकाणी येत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही असा आक्रमक पवित्राच नवनीत राणा यांनी घेतला होता. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.