TOD Marathi

मुंबई | माजी भाजप खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला केला आहे. तर किरीट सोमय्या यांनी या व्हिडीओच्या चौकशीची मागणी केली आहे. किरीट सोमय्या यांच्यावर प्रामुख्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते टीका करत आहेत.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यापाठोपाठ आता खासदार संजय राऊत यांनीही सोमय्या यांचं नाव न घेता सूचक ट्वीट केलं आहे. खासदार संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की आमच्यावर आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. ते सांगायचे, जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका. आता नेमके तसेच घडत आहे. यापुढे देखील बरंच काही घडणार आहे. जे जे होईल ते पाहत राहावे.. जय महाराष्ट्र!

हेही वाचा ” …बोगस खते-बियाणे विक्रीविरोधात कायदा करण्यासाठी समिती स्थापन; कृषी मंत्र्यांची माहिती”

या ट्वीटवर राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मेन्शन केलं आहे. राऊत यांनी या ट्वीटमध्ये सोमय्या यांचा उल्लेख केलेला नाही. परंतु या ट्वीटवर सोमय्या प्रकरणाशी संबंधित कमेंट्स दिसत आहेत.