TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 15 मे 2021 – देशात ‘गुगल पे’ सेवा वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, या सेवेद्वारे अद्याप आंतरराष्ट्रीय पेमेंट्स करता येत नाही. पण, आता गुगल पे अ‍ॅप्लिकेशनने आंतरराष्ट्रीय पेमेंट्स आणि मनी ट्रान्स्फरच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अमेरिकेतल्या व्यक्ती यांना भारत व सिंगापूरमधल्या आपल्या कुटुंबीय तसेच मित्रमंडळींना आता गुगल पेद्वारे पैसे पाठवता येणार आहेत.

मागील वर्षभरात 25 कोटींहून अधिक नागरिकांनी 500 अब्ज डॉलरहून अधिक रक्कम आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठवली होती. सध्या तरी आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर 6.5 टक्के व्यवहार शुल्क आकारलं जात असून ते अधिक आहे.

या आंतरराष्ट्रीय पेमेंट्ससाठी गुगलने वेस्टर्न युनियनशी पार्टनरशिप केलीय, असे सूत्रांनी सांगितलं आहे. चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत ‘गुगल पे’च्या युजर्सना सुमारे 200 देशांत पैसे ट्रान्स्फर करण्याची सुविधा उपलब्ध होणार असून ‘वाइज’ या आणखी एका प्लॅटफॉर्मसह गुगल करार करणार आहे. सध्या भारतासाठी ‘गुगल पे’चे आंतरराष्ट्रीय मनी ट्रान्स्फर वेस्टर्न युनियनच्या माध्यमातून होणाराय. ज्या देशांत वेस्टर्न युनियन आणि वाइज असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील, तिथल्या युजर्सना दोन्हीपैकी कोणताही एक पर्याय निवडण्याची मुभा असणार आहे.

हे लक्षात ठेवा :
‘गुगल पे’द्वारे पैसे पाठविणे सोपं आहे. अमेरिकेत असलेल्या व्यक्ती त्यांचे भारतातले कुटुंबीय किंवा मित्रमंडळी यांचा नंबर ‘गुगल पे’वर सर्च करू शकतात. तो फोन नंबर भारतात गुगल पेवर रजिस्टर्ड असला पाहिजे. तसेच भारतातल्या एका बँक अकाउंटशी लिंक्ड असावा. अमेरिकेतून केवळ डॉलरमध्ये पैसे पाठवता येतील.

व्यक्तीचे डिटेल्स सिलेक्ट केल्यावर त्याला किती डॉलर पाठवायचे आहेत?, ते संबंधित व्यक्तीने तिथे लिहावं किव्हा सांगावे. त्यानंतर वेस्टर्न युनियन किंवा वाइजमध्ये उपलब्ध असलेला एक पर्याय निवडावा. त्यानंतर, हे पैसे हस्तांतरित व्हायला किती वेळ लागेल? याची आणि करन्सी कन्व्हर्जननंतर (चलन रूपांतरण) समोरच्या व्यक्तीला किती पैसे मिळतील, याचीही माहिती देण्यात येईल.

आंतरराष्ट्रीय व्यवहारांत पैसे पाठवणाऱ्याला किंवा पैसे स्वीकारणाऱ्याला गुगलकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. वेस्टर्न युनियनने असं सांगितलं आहे, जूनच्या मध्यापर्यंत या व्यवहारांवर अतिरिक्त ट्रान्झॅक्शन चार्ज आकारला जाणार नाही.

‘गुगल पे’मध्ये लिंक्ड असलेल्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्स्फर होत असतात. अमेरिकेतला युजर ‘गुगल पे’शी निगडित असलेल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे पाठवू शकणार आहे. पैसे पाठवण्याची किमान मर्यादा नाही, मात्र कमाल मर्यादा वेगवेगळ्या कारणांवर अवलंबून असणार आहे.