दिल्ली | राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. या सरकारला शेतकरी, महिला, मध्यमवर्गीय यांची जन की बात ऐकण्यापेक्षा मन की बात करण्यातच स्वारस्य आहे. विरोधकांचा आवाज दाबला जातो आहे, यातूनच सरकारची भीती स्पष्ट होते, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसंच या सरकारला आरसा पाहायचा नाही अशीही टीका अमोल कोल्हेंनी केली.
सरकारची कार्यपद्धती पाहून मला महात्मा गांधींची तीन माकडं आठवतात. सरकारच्या विरोधात काही ऐकू नका, निवडणूक सोडून देशाची स्थिती पाहू नका आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांना थंड करुन त्यांची बोलती बंद करायची हेच या सरकारचं धोरण आहे. या सरकारवर कसा विश्वास ठेवायचा जे सरकार आर्थिक प्रगतीचे आकडे फेकते पण महागाईवर बोलत नाही. माननीय गृहमंत्री म्हणाले की आकडे कधीच खोटं बोलत नाही. देशाची अर्थव्यवस्था जेव्हा पाचव्या क्रमांकावर आहे तेव्हा देश पर कॅपिटा इन्कमच्या बाबत १४१ व्या स्थानावर आहे असंही अमोल कोल्हे म्हणाले.
हेही वाचा “ …मोदी-अदाणींचं नाव घेत प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट; म्हणाले, सोन्यापेक्षा महागड्या…”
देशाची संपत्ती ही ठराविक धनाढ्यांच्या हातातच दिली जाते आहे का? या सरकारने किसान सन्मान निधीचा उल्लेख केला पण किटकनाशकं आणि तणनाशकं यांच्यात झालेल्या तोट्यावर कुणी काही बोललं नाही. अर्थमंत्र्यांनी आज त्यांच्या भाषणात टोमॅटोचा उल्लेख केला. मी आज त्यांना सांगू इच्छितो मागच्या चार ते पाच वर्षांपासून आमच्या महाराष्ट्रतले शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकत होते, त्यावेळी त्यांचे अश्रू पुसायला हे सरकार आलं नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून माझ्या मतदार संघातल्या एका कांदा उत्पादकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून आत्महत्या केली आणि त्याचं कारण तुमचं चुकीचं निर्यात धोरण आहे. आज हे सरकार सामान्यांचं सरकार नाही. अशा सरकारवर आमचा विश्वास नाही. त्यामुळे मी अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. पण आज या सरकारला मी लोकमान्य टिळक यांचीच एक ओळ सांगणार आहे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे? याबाबत आत्मचिंतन झालं पाहिजे असं म्हणत अमोल कोल्हेंनी सरकावर टीका केली आहे.