मराठीबरोबरच हिंदुत्वाच्या (MNS on Hindutva and Marathi) मुद्यावर आक्रमक झालेली मनसे आता ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’ ही घोषणा देणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर आजपासून मनसेची सदस्य नोंदणी मोहीम सुरु होणार आहे. आज राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत पुण्यात या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. मनसेच्या पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयात सकाळी या मोहिमेला सुरुवात होत आहे.
साधारण 2014 पासून मनसेच्या राजकीय घोडदौडीला ब्रेक लागलाय. त्यानंतर मनसेनं मशिदीवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेतला होता. आता मनसेच्या नव्या घोषवाक्यात मराठी अस्मितेसह हिंदुत्वाच्या मुद्याची जोड दिली आहे. त्यामुळे मनसेची पुढची राजकीय भूमिका आता स्पष्ट झाली आहे. या मुद्यावर मनसेला पुन्हा सूर गवसणार का याची उत्सुकता आहे.
आगामी निवडणुकांपूर्वी राज्यभर मनसेची सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे. (State wide membership drive) या सदस्य नोंदणी मोहिमेसाठी मनसेच्या वतीनं नवं घोषवाक्य जाहीर केलं आहे. ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’ असं मनसेचं नवं घोषवाक्य असणार आहे. मनसेच्या या नव्या घोषवाक्यात मराठी अस्मितेसह हिंदुत्त्वाचा मुद्दा जोडण्यात आला आहे. यापूर्वी पक्ष स्थापनेवेळी राज ठाकरे यांनी ‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’ हे घोषवाक्य दिलं होतं.