मुंबई : भोंगा प्रकरण राज्यभर गाजत असतानाच मनसेच्या वर्तुळात विविध राजकीय घडामोडींना वेग येत आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली आहे. त्यापूर्वी त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासह अन्य काही अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी जवळपास 20 मिनिटे चर्चा केल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानावर दाखल झाले. त्या ठिकाणी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
माझ्या कार्यालयात मला एक धमकीचे पत्र आलेलं आहे. त्यामध्ये राज ठाकरेंसह मलाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या पत्रासंदर्भात गृहमंत्र्यांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. भोंग्याचा विषय हा सामाजिक आहे, याचा पुनरुच्चार देखील त्यांनी केला. राज ठाकरे यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल असा मोठा वक्तव्य देखील यावेळी बाळा नांदगावकर यांनी केलं. उत्तर प्रदेश सरकारचं मुंबईत कार्यालय असणार यावर बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अयोध्येत कार्यालय उघडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.