TOD Marathi

मुंबई : भंडारा गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक कालच पार पडली आणि यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका विधानामुळे महाविकास आघाडीत वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. भंडारा गोंदियात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला एकाकी पाडण्यात आलं. असं असतानाही काँग्रेसने भंडाऱ्यात भाजपच्या एका नाराज गटाला सोबत घेत सत्ता स्थापन केली मात्र गोंदियात सत्तेबाहेर राहावे लागले.

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत आघाडी केल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संतापले आहेत. त्यांनी ट्वीट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

भंडारा हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृहजिल्हा आहे. प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यातील जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची निवडणूक काँग्रेसने प्रतिष्ठेची करत भाजपला सुरूंग लावला व भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या 5 सदस्यांना सोबत घेत सत्ता स्थापन केली.

राष्ट्रवादी काँग्रेसने भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भाजपसोबत युती केली आणि आघाडीचा धर्म पाळला नाही. काँग्रेसला एकाकी ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. दरम्यान चरण वाघमारे यांना भाजपातून निलंबित केल्याची घोषणा भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

गोंदिया जिल्हा परिषदेतही काल जि.प. पदाधिकाऱ्यांची निवड होती. तेथेही भंडारा जिल्हा परिषदेप्रमाणेच भाजपा व राष्ट्रवादीने युती केली. एकूण ५३ सदस्यीय गोंदिया जि.प. मध्ये २६ सदस्य असलेल्या भाजपला बहुमतासाठी केवळ एका मताची गरज होती. तेथे काँग्रेस १३ सदस्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथेही काँग्रेसला एकाकी पाडून भाजपचा अध्यक्ष, तर राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष निवडून आला.

या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा झाल्यानंतरही जो दगाफटका राष्ट्रवादीने केला, आमच्या पाठीवर सुरा खुपसला हे बरोबर नाही, यामुळे आघाडीचा धर्म पाळला गेला नाही. याबाबत आम्ही आमच्या हायकमांडला कळवू असं स्पष्ट केलेलं आहे.