मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांचा राज्यसभेचा कार्यकाळ नुकताच संपलेला आहे. यानंतर छत्रपती संभाजीराजे कुठली भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. येत्या 12 तारखेला पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपण पुढची दिशा स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
यापूर्वी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. मुंबई येथे देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून माझी निवड होण्यामागे त्यांचाही मोलाचा हातभार होता, याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले, अशी पोस्ट देखील त्यांनी सोशल मीडियावर केली होती.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेतल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी पत्रकारांशी संवाद देखील साधला होता. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलं होतं की विविध विषयांवर माझी सविस्तर भूमिका ही मी 12 तारखेला पुणे येथे होणाऱ्या पत्रकार परिषदेत मांडणार आहे.
त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आता छत्रपती संभाजीराजेंच्या पुणे येथे होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे लागलेले आहे. राज्यभरात विविध घडामोडी होत असताना छत्रपती संभाजीराजे कोणती भूमिका घेणार? संभाजी राजे नवा पक्ष काढणार का? किंवा यापुढे त्यांची राजकीय वाटचाल कशी असेल? याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींचा उलगडा 12 तारखेला होणार असलेल्या पत्रकार परिषदेत होणार आहे.