सिंधुदुर्ग:
शरद पवार आजपर्यंत व्यासपीठावर भाषण करताना कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नव्हते. शिवरायांचं नाव घेतली की मुस्लीम मतं जातील, या भीतीने शरद पवार हे शिवाजी महाराजांचं नाव घेणं टाळतात, असा थेट आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. मी शरद पवारांना ते व्यासपीठावर फक्त शाहू-फुले-आंबेडकरांचा उल्लेख का करतात? शिवाजी महाराजांचं नाव का घेत नाहीत, असा प्रश्न विचारला होता. त्यावर शरद पवार यांनी म्हटले होते की, शाहू-फुले-आंबेडकर हा एक विचार आहे. मग शिवाजी महाराजांच्या विचारांना काहीच अर्थ नाही का, तो विचार नव्हता का? शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा मूळ पाया हा शिवाजी महाराज हेच होते ना, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. (MNS Chief Raj Thackeray questioned Sharad Pawar) ते गुरुवारी सिंधुदुर्ग येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. (Raj Thackeray is on Sindhudurg tour for party works)
यावेळी राज ठाकरे यांनी सध्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांशी संबंधित इतिहास आणि आक्षेपार्ह वक्तव्यांवरुन सुरु असलेल्या वादाबाबत भाष्य केले. सध्या कोणीही एवढीशी गोष्ट बोलतं आणि वाद निर्माण होतात. या सगळ्याचा वापर जातीच्या राजकारणासाठी केला जात आहे. यापूर्वीच्या लोकांना इतिहास कळतच नव्हता का? आता यांनाच सगळा इतिहास अचानक कळायला लागला आहे का? महाराष्ट्रात हे सगळे प्रकार १९९९ पासून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून सुरु झाले आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पश्चिम महाराष्ट्रानंतर कोकण दौऱ्यावर आहेत. पक्ष संघटन बांधणीसाठी राज ठाकरे हा दौरा करत आहेत. यापूर्वी त्यांनी पुणे, कोल्हापूर येथेही दौरा केला आहे.