TOD Marathi

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा पार पडली. विविध मुद्दे राज ठाकरे यांनी आपल्या सभेत मांडले. काही मुद्द्यांवर आपली भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली तसेच गेल्या दोन दिवसात अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर झालेल्या चर्चेवरही त्यांनी आपली मतं मांडली.

 

राज ठाकरेंच्या सभेतील प्रमुख मुद्दे;

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुण्यात सभा पार पडली. सभेत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. राज ठाकरेंच्या आजच्या सभेत काही अंध विद्यार्थी आले होते, त्या विद्यार्थ्यांनां त्यांना मंचावर बसवलं.

 

नदी पात्रातील सभेचा विषय सुरु होता, पावसाची शक्यता होती, काल मुंबईतही पाऊस सुरु होता. निवडणुका नाहीत काही नाही उगाच कशाला भिजत भाषण करा, असा टोला राज ठाकरेंनी शरद पवार यांना लगावला.

माझ्यावर येत्या १ तारखेला शस्त्रक्रिया होणार आहे. कमरेला त्रास होत असल्यानं मुंबईला गेलो होतो. कुणालाही न सांगता शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलो तर पत्रकार महोदय कोणते कोणते अवयव बाहेर काढतात, त्यांचंही वाईट वाटतं. ते स्कुटरवरुन फिरतात.

 

आजच्या सभेचं मुद्दाम आयोजन करण्याचं कारण म्हणजे अयोध्या दौरा तूर्तास रद्द, अनेकांना आनंद झाला, अनेकांनी कुत्सितपणे टीका केली. मी त्यांना दोन दिवसांचा वेळ दिला होता. सर्वांचं बोलून झाल्यावर मी माझी भूमिका सर्वांना सांगेन. मी अयोध्येला जाणार असं जाहीर केल्यावर हे प्रकरण सुरु झालं. मग, अयोध्येला येऊ देणार नाही असं प्रकरण सुरु झालं. मला दिल्ली, मुंबई आणि उत्तर प्रदेशातून माहिती मिळाली.

रामजन्मभूमीचं प्रकरण सुरु झालं त्यावेळी दूरदर्शन होतं, इतक्या वाहिन्या नव्हत्या. मुलायमसिंग यांच ंउत्तर प्रदेशात सरकार होतं. त्यावेळी कार सेवकांना ठार मारण्यात आलं होतं. शरयू नदीत तरंगणारी प्रेत मी पाहिली होती. मी माझे मनसैनिक अयोध्येला जाणार होतो. शरयू नदी काठावरील त्या ठिकाणाला भेट देणार होतो. महाराष्ट्रातून हजारो हिंदू बांधवं माझ्यासोबत अयोध्येला आले असते, जर तिथं काय झालं असतं तर आपली पोरं अंगावर गेली असती. तुमच्यावर केसेस टाकून तुरुंगात सडवण्यात आलं असतं. मी आपली पोरं हकनाक घालवणार नाही, असं मी बाळा नांदगावकर यांना सांगितलं. मनसैनिकांवर केसेस लावल्या असत्या आणि इथं निवडणुकीच्या वेळी कोणीच राहिलं नसतं, असं राज ठाकरे म्हणाले.

उत्तर प्रदेशात एक खासदार उठतो आणि विरोध करतो, हा सगळा डाव होता. माझ्यावर टीका होत असेल तर टीका सहन करायला तयार आहे पण माझी पोरं अडकू देणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले. गेल्या १४ आणि १५ वर्षांपूर्वीच्या गोष्टीची जाग आली. राज ठाकरेंनी माफी मागितली तरचं अयोध्येत पाय ठेवू यातून चुकीचे पायंडे पडतात हे सगळ्यांनी लक्षात ठेवाव, असं राज ठाकरे म्हणाले.

गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर म्हणून गृहस्थ आहेत. तिथं उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांपैकी एकानं बलात्कार केला. यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर ते मध्यप्रदेशमध्ये गेले त्यानंतर तिथं त्यांना मारहाण करण्यात आली. यानंतर ते महाराष्ट्रात आले, असं राज ठाकरे म्हणाले.

जर मशिदीवर बांग जोरात लागली तर हनुमान चालिसा जोरात लावा, असं मी सांगितलं. राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणणार असं सांगितलं, त्यानंतर त्यांना अटक झाली. मधू इथे आणि चंद्र तिथे, असं झालं. त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. शिवसैनिक आक्रमक झाले. लडाखमध्ये संजय राऊत आणि राणा दाम्पत्य जेवतानाचे फोटो समोर आली. यांचं हिंदुत्त्व ढोंगी आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

आमचं खरं हिंदुत्व तुमचं खोटं हिंदुत्व चाललंय, खरं हिंदुत्व काय आहे याचे रिझल्ट आम्ही महाराष्ट्रातील मराठी माणसाला देतो. महाराष्ट्रात रेल्वे भरती होती, उत्तर भारतीय लोकं महाराष्ट्रात आली. त्या लोकांचा फोटो पाहून भेटून घ्या, आमचे लोक त्यांना भेटायला गेले होते. तिथं बोलायला गेले होते. तिथल्या एकानं आमच्या पदाधिकाऱ्याला आईवरुन शिवी दिली आणि प्रकरण सुरु झालं.

 

महाराष्ट्रात रेल्वे भरती आहे याच्या जाहिराती उत्तर भारतातील वृत्तपत्रात येत होत्या. ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री झाल्यानंतर स्थानिक भाषेत परीक्षा घेण्यास सुरुवात केली आणि महाराष्ट्रातील युवकांना रोजगार मिळाला.

राज ठाकरेंनी आंदोलन अर्धवट सोडल्याचं एक उदाहरण दाखवा. मनसेमुळं महाराष्ट्रातील ६४ ते ७० टोलनाके मनसेमुळं बंद झाले. यांची काहीच जबाबदारी नाही. बाकीच्या पक्षांची काहीच जबाबदारी नाही. आपल्या मुंबईत बॉलिवडूमध्ये पाकिस्तानी कलावंत येत होते त्यांना देशातून हाकलून दिलं, त्यावेळी हिंदुत्वाची पक पक करणारे कुठं होते. रझा अकादमीच्या मोर्चावेळी आमच्या पोलीस भगिनींवर हात टाकला होता. त्यावेळी मनसेनं मोर्चा काढला.

उद्धव ठाकरे यांच्यावर एकतरी आंदोलन केल्याची केस आहे का? मराठीचा प्रश्न असो, हिंदुत्वाचा प्रश्न असो एक तरी केस आहे का? केंद्रात सत्ता होती संभाजीनगर नामांतराचा प्रश्न मिटवला का, असा सवाल राज ठाकरेंनी केला. संभाजीनगर, जालना आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाणी येत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

देशात समान नागरी कायदा आणावा, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा आणि औरंगाबादचं  लवकरात लवकर नामांतर करावं, अशी तीन मागण्या नरेंद्र मोदींकडे आहेत.

राजकारणासाठी हिंदू मुस्लीमांच्या विरोधात बोलण्यासाठी एमआयएमला मोठं केलं. आपण एक राक्षस वाढवतोय, हे लक्षात आलं नाही. एमआयएमचा खासदार निवडून आला. शिवसेनेचा तिकडचा खासदार पडला आणि एमआयएमचा खासदार निवडून आला, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

औरंगजेब हा शरद पवार यांना सुफी संत वाटतो का? अफजलखान हा त्याचं राज्य वाढवायला आला होता असं म्हणतात. तो शिवाजी महाराजांना मारायला आला होता, असं राज ठाकरे म्हणाले.