मुंबई :
पावसाळी अधिवेशन सुरू असताना (Maharashtra Assembly Monsoon Session) महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. विधिमंडळाच्या (Vidhan Bhavan ) पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार एकमेकांना भिडल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे (MLA Amol Mitkari and MLA Mahesh Shinde) यांच्यात धक्काबुक्की झाली. या सगळ्या राड्याविषयी आमदार अमोल मिटकरी यांनी आपली बाजू मांडली आणि महेश शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
‘महाविकास आघाडीची काल बैठक झाली होती. (Mahavikas Aghadi) या बैठकीत ठरलं होतं की, सध्या शेतकरी अडचणीत असल्याने सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज सकाळी साडेदहा वाजता आंदोलन करण्यात यावं. या आंदोलनासाठी आम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जमलो होतो. आंदोलन शांतपणे सुरू होतं. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार महेश शिंदे यांनी आम्हाला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला आणि आई-बहिणीवरून शिवीगाळ करण्याचाही प्रयत्न केला,’ असा आरोप अमोल मिटकरी यांच्याकडून करण्यात आला आहे.