TOD Marathi

पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधिमंडळ परिसरात पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी गटाचे आमदारांमध्ये चांगलाच राडा झाला. यावेळी शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Mahesh Shinde vs Amol Mitkari) यांच्यात चांगलीच बाचाबाची देखील झाली. तेव्हा दोन्ही बाजूचे आमदार एकमेकांवर धावून गेले आणि विधानभवनातील वातावरण वातावरण प्रचंड तापलं. हा वाद झाल्यानंतर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली.

महाविकास आघाडीचे आमदारांना तुम्हाला धक्काबुक्की केली का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावर भरत गोगावले म्हणाले की ‘ते आम्हाला कसली धक्काबुक्की करणार’ आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे आता हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.

भरत गोगावले यांनी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आम्ही 170 आमदार उतरलो असतो तर त्यांचा काय झालं असतं. विधान मंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी विरोधकांना झोंबली. त्यामुळे त्यांनी मध्ये येऊन गोंधळ घातला मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ, त्यांनी आमचा नाद करू नये. यापुढे कोणीही आमच्या अंगावर आले तर शिंगावर घेऊ असेही भरत गोगावले म्हणाले.

या गोंधळाच्या काही मिनिटं आधी बोलताना अजित पवार (LOp Ajit Pawar) म्हणाले की ‘पचास खोके एकदम ओके’ ही घोषणा सत्ताधाऱ्यांच्या एवढी जिव्हारी लागली की ते नाराज झालेले दिसत आहेत. यामुळेच आज त्यांच्यातील काही आमदार पायऱ्यांवर आलेत.

आंदोलनासाठी आम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जमलो होतो. आंदोलन शांतपणे सुरू होतं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटातील महेश शिंदे यांनी आम्हाला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला आणि आई-बहिणीवरून शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप अमोल मिटकरी यांच्याकडून करण्यात आला.