Maratha reservation : ‘या’ 5 जिल्ह्यांमध्ये असणार मूक आंदोलन; कोल्हापुरातून एल्गार

टिओडी मराठी, कोल्हापूर, दि. 11 जून 2021 – आरक्षण मिळावे, यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर, नाशिक, अमरावती, संभाजीनगर, रायगड येथे मूक आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासाठी आता लढाई सुरू झाली आहे.

मराठा समाजातील आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेल्यांना देशात पहिले आरक्षण ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिले, त्या शाहू भूमितून म्हणजे कोल्हापुरातून 16 जूनपासून मूक आंदोलनाने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा एल्गार सुरू होणार आहे.

कोल्हापूर शहरातील शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी दुपारी सकल मराठा समाजाच्या प्रमुख समन्वयकांची बैठक पार पडली. त्यानंतर संभाजीराजे भोसले यांनी मोर्चाऐवजी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारक समाधी स्थळाजवळ मूक आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला.

सकल मराठा समाजाचे समन्वयकांबरोबर जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, मंत्री यांनी मूक आंदोलनामध्ये सहभागी व्हावे.

आम्ही या आंदोलनामध्ये कोणीच बोलणार नाही; पण, आमदार, खासदार, मंत्री यांनी येथे येऊन आपली मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी. आम्हाला तुमच्या पाठिंब्याची पत्रे नको. तुम्ही तेथे या, भूमिका स्पष्ट करावी.

आरक्षण देण्याकरिता कशा पद्धतीची जबाबदारी घेणार?, ते ठोसपणे सांगा, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले. नाशिक, अमरावती, औरंगाबाद, रायगड जिल्ह्यातही मूक आंदोलन होणार आहेत. सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर एकदा जोर लावला जाणार आहे.

पुण्यातून थेट मंत्रालयावर लाॅगमार्च काढण्यात येईल. त्यात महाराष्ट्रातील सकल मराठा सहभागी होणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. सकल मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या समाधीला 12 जून रोजी खासदार संभाजीराजे भेट देऊन त्यांना अभिवादन करणार आहेत.

Please follow and like us: