टिओडी मराठी, कोल्हापूर, दि. 17 जून 2021 – मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली पावसात मराठा क्रांती मूक आंदोलन केले. कोरोनाच्या नियमांचे पालन करत शांततेत झालेल्या या आंदोलनाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी मराठा समाजाला आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार सकारात्मक आहे. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ठाम ग्वाही बुधवारी जिह्यातील सर्व खासदार आणि आमदारांनी दिलीय. या दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात आपण दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून येथील छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारकस्थळी बुधवारी सकाळी 10 ते 1 या वेळात मूक आंदोलन केले.
पावसात झालेल्या या आंदोलनात पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, जिह्यातील सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह युवराज्ञी संयोगिताराजे, युवराज कुमार शहाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आदी छत्रपती घराण्यातील सर्व सदस्य देखील उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला. सर्वपक्षीय नेत्यांनी यावेळी मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आपली भूमिका मांडली.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आंदोलनस्थळी आले. त्यांनी भूमिका न मांडता संभाजीराजे यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. पावसात लोकप्रतिनिधी, समन्वयक आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यासह सर्व आंदोलक जमिनीवर बसले होते.
चर्चेला तर आम्ही जाऊ. चर्चाही करू; पण यातून सकारात्मक निर्णय काय होणार?, हे आम्ही पाहणार आहे. जर आमच्या मागण्या निकाली लावल्या जाणार असतील तर त्या निर्णयाचे स्वागत करू. मागण्या मान्य झाल्या तर नाशिकमध्ये होणारे आंदोलन विजयोत्सव म्हणून साजरा करू, असे संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.
मूक आंदोलनावेळी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्याशी बैठक घेण्याची ग्वाही दिलीय.
महाराष्ट्रात प्रथमच बुधवारी कोल्हापुरात झालेल्या मराठा मूक आंदोलनात जिह्यातील सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी उपस्थिती लावल्याबद्दल आभार व्यक्त करत संभाजीराजे म्हणाले, पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बैठक घेण्याची ग्वाही दिलीय. त्यामुळे याबाबत दि. 17 समन्वयकांबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ. त्यानंतर दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहे.
मराठा आरक्षणप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. पण, मराठा आरक्षणाबद्दल पंतप्रधानांचे विचार काय आहेत?, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही, असे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी सांगितले आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार १०० टक्के सकारात्मक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिलीप वळसे-पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात या सर्वांना संभाजीराजेंशी चर्चा करून मार्ग काढायचा आहे, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले आहे.
मूक आंदोलनाची दखल राज्य सरकारला घ्यावी लागेल. मराठा आरक्षणाचा निर्माण झालेला प्रश्न सोडवला पाहिजे. याबरोबरच अनुसूचित जाती आणि ओबीसींच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्नहि सरकारने सोडवून न्याय द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
सलाईन लावून खासदार धैर्यशील माने यांची उपस्थिती:
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार धैर्यशील माने हे काही दिवसांपूर्वी दोनदा कोरोना पॉझिटिव्ह आले होते. उपचारानंतर त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आलाय. सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. बुधवारी आंदोलनस्थळी सलाईनसह उपस्थित राहून त्यांनी मराठा आरक्षणप्रश्नी आवाज उठविण्यात कमी पडणार नाही, अशी ग्वाही दिली.