TOD Marathi

राष्ट्रवादीच्या ‘मंथन’मध्ये काय ठरलं?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील ‘राष्ट्रवादी मंथन-वेध भविष्याचा’ या शिबिराच्या अखेरच्या दिवशी पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून येणाऱ्या काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नवी दिशा दिली.

 

पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी शिबिराला संबोधित केले. वाजपेयी यांच्या काळातील भाजप व आजचे भाजप यात मोठी तफावत आहे. याचा दाखला अनेक उदाहरणासह प्रफुल पटेल यांनी मांडला. २०१४ नंतर भाजपा लोकांचा विचार त्यांच्याकडे आकर्षित करण्याकडे यशस्वी झाले, असे ते म्हणाले.

आपणही आपला योग्य रस्ता निवडला पाहिजे. पवार साहेबांनी केलेल्या कामगिरीतून ते देशाच्या महत्त्वाच्या जागी बसले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून आजवर आपला पक्ष राज्यातील एक नंबरचा पक्ष का झाला नाही याचे आत्मपरीक्षण आपल्याला करायला हवे, असे प्रफुल पटेल ( Praful Patel ) यांनी सांगितले.

आपल्या पक्षाला बळकट कसे करायचे यासाठी प्रयत्न करायला हवे. आजचे राजकारण साधे सोपे समजून चालणार नाही. या राजकारणाला योग्य पद्धतीने लढा देण्याची भूमिका आपण स्वीकारायला हवी, असे आवाहन प्रफुल पटेल यांनी केले.

ईडीने कारवाई केलेल्या यादीत एकही भाजप नेते नाहीत. ते फक्त धुतल्या तांदळासारखे आहेत का? केंद्रीय यंत्रणा या स्वतंत्र आहेत असे सांगता हा काय दांभिकपणा आहे. तुमच्याकडे गेल्यावर शुभ्र कसा होता. शिखंडीसारखे का लढता असा संतप्त सवालही माजी मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) केंद्र सरकारला केला.

आता दिवाळी झाली काही जणांना खायलाही मिळाले नाही आनंदाचा शिधा तर लोकांच्या घरी पोचलाच नाही. नोटेवर देवांचे फोटो छापा अशी मागणी करता अरे आधी लोकांच्या हातात पैसा द्या मग नोटांवर फोटो छापा असे खडेबोल छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी सुनावले.

मुख्यमंत्री बोलत आहेत मोठ्ठा प्रकल्प राज्यात येणार आहे. मात्र त्यांनी फॉक्सकॉन प्रकल्प नेला आणि आपल्याला पॉपकॉर्न दिला आहे अशा शब्दात छगन भुजबळ यांनी सरकारवर टीका केली. महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचे काम होतेय. महाराष्ट्राला कमकुवत करु नका महाराष्ट्र हा देशाचा आधार आहे हे लक्षात ठेवा अशी भूमिका त्यांनी मांडली.

 

बुथ कमिट्यांचे काम पुन्हा शून्यातून उभे करून पूर्ण ताकदीने केले पाहिजे, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. राजकारण आणि मीडियाचे नाते हे डायलॉगचे असावे, तेथे प्रलोभन, धाक नसावा, असे मत सुप्रियाताईंनी व्यक्त केले.
काल भाजपाच्या अध्यक्षांचे भाषण ऐकले त्या ते म्हणाले की, महाविकास आघाडीमधील अनेक महिला भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. आमच्या पक्षात महिला नेतृत्व वाढणार आहे. चांगली गोष्ट आहे की, ते स्वतःच मान्य करतात की, त्यांच्याकडे स्वतःचे टॅलेंट नाही. सर्व तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेतून त्यांनी टॅलेंट उचलले आहे, अशी टीका सुप्रिया सुळे ( Supriya Sule )  यांनी केली.

हरी नरके यांनी सांगितले की, भाजपा सारखे तुम्ही थिंक टँक ठरवा. सगळे तर आमच्या कडून त्यांच्याकडे इंपोर्ट होतोय. मग त्यांच्या थिंक टँकचा उपयोग काय? जर त्यांचे थिंक टँग एवढे चांगले असतील मग लोकसभेमध्ये टॉप ५ मध्ये भाजपाचा एकही खासदार का नाही, असा प्रश्नही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

देशात सर्व क्षेत्रातील इन्फ्रास्टक्चर आम्ही उभं केले. आज आम्हाला विचारले जाते ६० वर्षामध्ये तुम्ही काय केले, तर मी सांगते की, आम्ही ६० वर्षात जे उभं केले त्यामुळेच तुम्ही आम्हाला असा प्रश्न विचारू शकतात, असे प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना दिले. आपण केलेले काम, आपल्या मेरीटवर आपण निवडणूक लढवूया आणि पूर्ण ताकदीने लढवूया, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.

शरद पवार यांनी महिलांना नेतृत्व देण्यासाठी केलेले काम व ज्यांना यातून संधी मिळाली त्या महिलांनी केलेली कामगिरी ही आपल्या सर्वांसाठी स्फूर्ती देणारी आहे. पवार साहेबांनी अनेकांना संधी दिली व त्यातून नवी फळी निर्माण झाली. २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. त्यासाठी आतापासून तयारी करण्याचा व २०२४ हे वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहे, ही भूमिका घेऊन आज आपण हा संकल्प करू या, असे आवाहन खासदार सुनिल तटकरे यांनी केले.

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड अल्पसंख्याकाबाबत बोलताना म्हणाले, अल्पसंख्याकांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला. अल्पसंख्याक म्हटले की फक्त मुस्लिम समाज डोळ्यासमोर येतो. पण तसे नाही तर इतर समाज देखील यामध्ये समाविष्ट आहे. शीख, ख्रिश्चन, पारसी असे अनेक धर्म अल्पसंख्याकमध्ये गणले जाते. गेल्या काही वर्षात अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम आणि बहुसंख्याक म्हणजे हिंदू असे वर्गीकरण या देशात सुरू झाले आहे, असे आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awad ) म्हणाले.

वक्फ जमिनी अंतर्गत अल्पसंख्याक समाजातील लोकांच्या सातबाऱ्याची कायमची नोंद करावी, जेणेकरून त्या जमिनी कोणालाही विकता येणार नाही असा कायदा महाराष्ट्रात अंमलात आला. हा निर्णय मी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला. अल्पसंख्याक समाजासाठी माझ्याहातून हे महत्त्वाचे काम झाले, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात धर्माच्या नावाखाली जे काही सुरू आहे ते अत्यंत वाईट आहे. बिलकिस बानोच्या बाबतीत जो निर्णय घेण्यात आला. हा त्यांच्यावर अन्याय करणारा आहे. त्यांच्या कुटूंबातील १४ जणांना मारले गेले तर त्यांना जगण्याचा अधिकार नव्हता का असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. धर्माला मध्ये आणून अशा पद्धतीने गुन्हेगारांना समाजामध्ये संरक्षण देणार असू तर समाजात दुफळी माजल्याशिवाय राहणार नाही, असे परखड मत आव्हाड यांनी व्यक्त केले.

आरोग्य सेवा ही सुद्धा एक समाजसेवेचा एक भाग आहे. अनेक लोक आरोग्य सेवा देऊन त्याचा उपयोग राजकरणात करून घेतात. आरोग्य सेवेचे कार्य हे अविस्मरणीय आहे. आपल्याला देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लढताना आरोग्य सेवेचे कार्य करायला हवे. आरोग्य विभागाला सत्तेत दुय्यम स्थान देण्यात येत होते मात्र कोरोना संक्रमणाचा झालेला आघात आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचा धडा देऊन गेला, असे मत माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope )  यांनी व्यक्त केले.

कोरोना काळात महाविकास आघाडीने सत्तेत असताना सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागू नये यासाठी केलेलं काम समाधान देणारे आहे. यासाठी केलेल्या प्रत्येक कामाचा आणि महत्वपूर्ण निर्णयांचा दाखला आपल्याला लोकांपुढे मांडण्याची गरज आहे. आपण केलेल्या कामांची दाखल ही इतर राज्यातील लोकांनीही घेतली, असे मार्गदर्शन टोपे यांनी केले.

आपण सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचावली तर लोक आपल्याला निश्चितपणे स्वीकारतील यात शंका नाही. तृतीयपंथी लोकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळवून देण्याचा निर्णय आपण सत्तेत असताना घेतला, याचे स्मरण त्यांनी यावेळी करून दिले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुका नजरेपुढे ठेवून करण्यात येणाऱ्या १० महत्वपूर्ण मुद्द्यांकडे राजेश टोपे यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक यांचा आज विचार केला तर गेले अनेक वर्षापासून देशाच्या राजकारणात खेळण्यासाठी ते वापरत असलेले मास्टर कार्ड्स आता त्यांच्याकडे राहिलेले नाही. राम मंदिर, ३७० कलम ही मास्टर कार्ड खेळून झालीत. आता फक्त राहिले एक्सट्रीम हिंदुत्व. दोन धर्मांमध्ये वेगवेगळे, कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाद चालू ठेवायचे आणि आपल्या राजकारणाची पोळी भाजायची आहे, अशी टीका माजी सामाजिक मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

अतिवृष्टीमुळे यंदाची शेतकऱ्याची दिवाळी अंधारात, दुःखी गेली. नव्या सरकारने मदतीची घोषणा केली. परंतु मिळाले काहीच नाही. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करा. जो पर्यंत जाहीर करत नाही तो पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही. गरज पडली तर तुम्हाला रस्त्यावर सुद्धा फिरकू देणार नाही, असे थेट आव्हान धनंजय मुंडे यांनी केले.

पक्षाच्या दृष्टीकोनातून विस्तार झाला पाहिजे व पक्ष मजबूत झाला पाहिजे. संघटनेशिवाय पक्षाची मजबूती नाही. सरकारच्या विरोधी वातावरण आहे. महागाई वाढलेली आहे, भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, एजन्सीचा गैरवापर होतोय, आणीबाणीप्रमाणे एक असदृश्य वातावरण देशभरात आहे, हे जरी खरे असले तरी आपल्याला निवडणुका सोप्या जातील अस वाटले तरी कोणताही निवडणुका हवेत जिंकता येणार नाही, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

किती भाषणे केली तरी जो पर्यंत ग्रामपर्यंत, वाड्या वस्तीपर्यंत तसेच समजाातील सर्व घटकांपर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत संघटनेला अपेक्षित असे यश मिळत नाही. त्यामुळे गावपातळीवर संघटना मजबूत करण्यासाठी सदस्य नोंदणी व त्यानंतर बुथ कमिट्यांवर भर द्या व पक्ष संघटना मजबूत करा असे मार्गदर्शन एकनाथ खडसे यांनी केले.