TOD Marathi

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना ईडीने (ED) चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. परब यांनी मात्र शिर्डीत साईबाबांच्या दरबारात हजेरी लावली. अनिल परब यांचा दौरा हा पूर्वनियोजितच होता. आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे आज ते ईडी कडे चौकशीला हजर राहणार नसल्याची माहिती त्यांनी  त्यांच्या वकिलांनी दिली होती. अनिल परब हे साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

आज सकाळी 10 वाजता अनिल  परब यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले होते. दापोलीतील  रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अनिल परब आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या संबंधित ठीकठिकाणी ईडीने छापा मारला होता. दरम्यान, अनिल परब आज चौकशीला उपस्थित राहणार का?  याकडेही  राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, अनिल परब हे पूर्वनियोजित कार्यक्रमांनुसार आज मुंबईत नसल्याने ते ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहू शकणार नसल्याची माहिती त्यांच्या वकीलामार्फत अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याची माहिती आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर केंद्रीय तपाय यंत्रणेचा दुरुपयोग सुरू असल्याचा  आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे (Shiv Sena) महत्त्वाचे नेते समजले जातात. मागील काही महिन्यांपासून अनिल परब ईडीच्या रडारवर आले आहेत.  काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल परब यांच्या खासगी आणि शासकीय निवासस्थानावर छापा मारला होता. त्याशिवाय अंधेरीतील शिवसेना पदाधिकाऱ्याच्या घरीदेखील छापा मारला होता. त्यावेळी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी जवळपास 12 तास ठाण मांडून होते.