टिओडी मराठी, मुंबई, दि. 6 ऑगस्ट 2021 – म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाकडून सुमारे ८ हजार २०५ घरांसाठी १४ ऑक्टोबरला सोडत काढली जाणार आहे. या सोडतीची जाहिरात २३ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ७० टक्के, अल्प उत्पन्न गटासाठी २७ टक्के घरे असणार आहेत. संपूर्ण सोडत पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी उच्चस्तरीय देखरेख समिती गठीत केली आहे. त्यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पूर्ण होणार आहे, असे आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे.
या योजनेतून ठाणे जिल्ह्यातील शिरढोण, खोणी, भंडार्ली, गोठेघर, मिरा रोड येथे तर पालघर जिल्ह्यातील विरार, बोळींज तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला इथे घरे उपलब्ध होणार आहेत.
या घरांसाठी अर्जाची किंमत ५६० रुपये असणार आहे. अर्जासोबत अत्यल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम ५ हजार, अल्प उत्पन्न गटासाठी १० हजार, मध्यम उत्पन्न गटासाठी १५ हजार, तर उच्च उत्पन्न गटासाठी २० हजार एवढी असणार आहे.
मासिक उत्पन्न मर्यादा अत्यल्प उत्पन्न गटासाठी २५ हजार रुपयांपर्यंत, अल्प उत्पन्न गटासाठी २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत, मध्यम उत्पन्न गटासाठी ५० हजार ते ७५ हजार रुपयांपर्यंत, तर उच्च उत्पन्न गटासाठी ७५ हजार रुपयांपेक्षा अधिक असणार आहेत.