TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 14 मे 2021 – महारष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुणे विभागातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. कोरोनावर सध्या नियंत्रण मिळवलं जात असून तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याची तयारी सुरू केली आहे. विशेषतः तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका अधिक आहे, म्हणून त्यादिशेनं तयारी केली जात आहे, त्यासाठी भारत बायोटेकला जमीन देणार आहे, असेही अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण महत्वाचं आहे, त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.

अजित पवार म्हणाले, कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हे महत्त्वाचं आहे. पण, लसींचा पुरवठा कमी असल्याने 18-44 वयोगटातील लसीकरण थांबवून त्या लसचा वापर 45 वर्षापुढील ज्यांचे दुसरे डोस शिल्लक आहेत. अशा नागरिकांसाठी केला जात आहे, असे अजित पवार म्हणाले. लसींचे उत्पादन राज्यात वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

पुण्यात सीरम कंपनीची लस तयार होते. त्याप्रमाणे भारत बायोटेकची लस तयार करण्यासाठी पुण्यात जमीन देण्याची प्रक्रिया सुरूय. त्यासह त्यांना लागणाऱ्या वीज आणि इतर सर्व सुविधा लवकर देणार आहे. साधारणपणे तीन महिन्यात या लसीचे उत्पादन पुण्यात सुरू होईल. भारत बायोटेकची लस निर्मती सुरू झाल्यानंतर त्याचा राज्याला फायदा होणार आहे. अर्धी लस केंद्राला दिल्यानंतर उर्वरित अर्धी राज्याला देण्याची मागणी करणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

पुण्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत आहे. पुण्याचील प्रशासन तसेच राज्य सरकार यासाठी प्रयत्न करीत आहेत. पवारांनी शुक्रवारी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी दुसऱ्या लाटेतून सावरत असताना तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या दृष्टीनं आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. त्यामुळं तिसऱ्या लाटेचा विचार करता वेगवेगळ्या भागात कशी सुविधा आहे? त्याचा आढावा घेण्यात येतोय. आवश्यक तशी तयारी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही अजित पवार म्हणाले.

संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका संभवणार अशी शक्यता व्यक्त केलीय. म्हणून त्यादिशेनं प्रय्तन सुरू केले आहेत. खास लहान मुलांसाठी बेड सज्ज करण्यात येत आहेत. यासंदर्भात बालरोग तज्ज्ञांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. तसेच बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्सही स्थापन करण्यात आली आहे. त्या माध्यमातून विविध तयारी केली जात आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

अशाप्रकारे लहान मुलांना अधिक धोका संभवल्यास त्यांच्या पालकांनी काय करावं? याबाबतही जनजागृती करणार आहे. अनेक ठिकाणी सुविधा आणि साहित्य उपलब्ध करण्याची तयारी सुरू आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी प्रस्ताव आले आहेत. त्याबाबत चाचण्या सुरू असून त्यांना मान्यता मिळाल्यानंतर लहान मुलांनाही लसीकरण करावं लागणार आहे, असे अजित पवार म्हणाले.