मुंबई : श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १०९.५७ कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पहिल्या टप्प्यात जेजुरी मंदिर व गड जतन आणि संवर्धन; तसेच परिसर व जल व्यवस्थापनाचे काम करण्यात येणार आहे.
श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकासासाठी ३४९.४५ कोटी रुपये रकमेचा आराखडा एकूण तीन टप्प्यांमध्ये राबविण्याचे नियोजन तयार करण्यात आले आहे. विकास आराखड्याचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर झाले. या वेळी ‘ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करताना त्या वास्तूची मूळ शैली जपणे आवश्यक असून, पुरातत्त्वीय जाण असलेल्या संस्थेमार्फत ही कामे करण्यात यावीत,’ असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
‘जेजुरी गडावरील मंदिराचे जतन आणि संवर्धन करताना परिसरातील इतर मंदिरेही पुरातत्त्व विभागांतर्गत संरक्षित करावीत,’ असेही त्यांनी सांगितले. जेजुरी गड विकास आराखड्यांतर्गत पहिल्या टप्प्यात वास्तूचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा आणि पर्यटक सोयी सुविधा, जलव्यवस्थापन करण्यात येणार आहे. या मंदिरास ऐतिहासिक समृद्ध वारसा असून, अनेक राज्यांतील नागरिकांचे हे कुलदैवत आहे. मागील २५० वर्षांत याचे जतन आणि संवर्धन झाले नसल्याने ते अत्यावश्यक असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सादरीकरणाद्वारे दिली.
या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आदी उपस्थित होते.