TOD Marathi

मुंबई : मनसेकडून बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो शेअर केल्यानंतर त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. बृजभूषण सिंह यांना राज ठाकरेंविरोधात महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून रसद पुरवली गेल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

यावर बृजभूषण सिंह यांनी त्यावर खुलासा केला आहे.  यावर बोलताना बृजभूषण म्हणाले की, शरद पवार देशाच्या मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. महाराष्ट्र कुस्ती संघासाठी त्यांनी मोठं काम केलं आहे. आम्ही कुस्तीसाठी जे काम केलं, त्यासंदर्भात ते माझं कौतुक करत होते.

तसेच तीन दिवसांपर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या माळा शरद पवारांसाठी येत होत्या, त्या मला घातल्या याचा मला गर्व आहे, असंही बृजभूषण यांनी म्हटलं आहे .

दरम्यान आजही शरद पवार आम्हाला भेटले, तर मी त्यांच्याशी नजर चुकवणार नाही. मी त्यांना नमस्कार करेन. ते माझ्यासाठी एक चांगले नेते आहेत. त्यांच्याकडून राज ठाकरेंनी काहीतरी शिकायला हवं, असा टोलाही सिंह यांनी राज ठाकरेंना यावेळेस लगावला आहे.