TOD Marathi

नागपुर:
महाराष्ट्रातून महाराष्ट्रातील व्यक्तीला राज्यसभेची उमेदवारी द्यायला हवी होती. मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी त्यांचं अभिनंदन केलं मात्र त्यांना जर महाराष्ट्रातून उमेदवारी देण्यात आली असती तर त्यांचा नागपूरशी, विदर्भाशी संपर्क राहिला असता असं मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातून बाहेरील व्यक्तीला उमेदवारी देण्यात येते तेव्हा राज्यातील नेत्यांना नाराजी वाटणं स्वाभाविक आहे असं देखील ते म्हणाले.

हायकमांडने घेतलेला निर्णय हा अतिशय विचारपूर्वक घेतलेला आहे मात्र मुकुल वासनिक यांना महाराष्ट्रातून आणि इम्रान प्रतापगडी यांना राजस्थानमधून उमेदवारी दिली असती तर मुकुल वासनिक यांना नागपुरसोबत, विदर्भासोबत संपर्क ठेवणं सोयीस्कर झालं असतं. आज दिल्लीत आयोजित केलेली महत्त्वाची बैठक अचानक का रद्द झाली? हे माहिती नाही असही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

अजूनही वेळ गेलेली नाही, इम्रान प्रतापगडी यांनी आज मुंबई विधानभवनात अर्ज सादर केला असला तरी ते जयपूरमधून आणि मुकुल वासनिक मुंबईतून अर्ज करू शकतात, अदला बदली होऊ शकते मात्र शेवटी हा निर्णय हायकमांडने सगळा विचार करून निर्णय घेतला असेल असं देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.