टिओडी मराठी, जेरुसलेम, दि. 2 जून 2021 – इस्रायल देशाच्या अध्यक्षपदी इसाक हर्रझोग यांची निवड झालीय. ज्येष्ठ राजकारणी असलेले इसाक यांचे कुटुंबही त्या देशातील जुने राजकीय घराणे म्हणून ओळखले जात आहे. 120 सदस्यांच्या संसदेने त्यांची आज एकमताने या पदी निवड झालीय.
अन्य देशांप्रमाणे इस्रायलमध्येही राष्ट्राध्यक्षपद हे बहुतांशी शोभेचे पद मानले जाते. या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला देशाच्या सत्ताकारणामध्ये फार मर्यादित अधिकार आहेत.
60 वर्षीय इसाक हे इस्रायलच्या लेबर पार्टीचे माजी अध्यक्ष आहेत. सन 2013 च्या निवडणुकीमध्ये त्यांनी पंतप्रधान नेतान्याहू यांच्या विरोधात अयशस्वी लढत दिली होती. विद्यमान अध्यक्ष रौवेन रिव्हलीन हे पुढील महिन्यामध्ये सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी ही नवीन निवड केली आहे.
इसाक यांचे वडील अमेरिकेतील इस्रायल देशाचे राजदूत म्हणून काम पाहात होते. त्यांचे काकाही इस्रायलचे पहिले विदेशमंत्री राहिले आहेत. त्यांनी ही अमेरिकेतील इस्रायलचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे. संसदीय राजकारणातून बाजूला झाल्यानंतर इसाक यांनी इस्रायलच्या इमिग्रेशन सिस्टिमसाठी सेवाभावी वृत्तीने काम केलं आहे.
राष्ट्राध्यक्षपद हे तेथील शोभेचे पद असले तरी त्या देशामध्ये सध्या अधिक प्रमाणात राजकीय अस्थिरता आहे, त्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारी मोठी आहे. इस्रायलमध्ये मागील दोन वर्षात चार वेळा राष्ट्रीय निवडणुका घ्याव्या लागल्यात. आजही नेतान्याहू हे आपली सत्ता टिकवण्यास अपयशी ठरले तर पुन्हा एकदा त्या देशात निवडणूक घ्यावी लागणार आहे.