टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 12 जून 2021 – ग्राहकांच्या सोयीसाठी, फसवणूक टाळण्यासाठी त्याचप्रमाणे आर्थिक स्थितीनुसार बँकांच्या नियमांत बदल केले जात आहेत. असेच काही महत्त्वाचे बदल आयडीबीआय बँकेमध्ये केले जाणार असून हि बँक 1 जुलैपासून काही महत्त्वाच्या नियमात बदल करत आहे.
बँकेने शुक्रवारी चेक लीफ चार्ज, सेव्हिंग अकाउंट चार्ज आणि लॉकर चार्जमध्ये बदल केलाय. ग्राहकांना आता केवळ दर वर्षाला 20 पानांचं चेकबुक मोफत देणार आहे. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक चेकसाठी 5 रुपये शुक्ल आकारणार आहे.
आतापर्यंत खाते उघडण्याच्या पहिल्या वर्षात बँकेच्या ग्राहकांना 60 पानांचे चेकबुक विनामूल्य मिळत होते. त्यानंतरच्या वर्षांत बँक 50 पृष्ठांचं चेकबुक देते. त्यानंतर प्रत्येक चेकसाठी ग्राहकाला ५ रुपयांचं शुल्क द्यावं लागतं.
हि सुधारित फी 1 जुलै 2021 पासून लागू होणार आहे, असे बँकेने जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. पण, हा नवीन नियम ‘सबका सेव्हिंग्ज अकाउंट’अंतर्गत येणाऱ्या ग्राहकांना लागू होणार नाही. त्यांना वर्षभर अमर्यादित विनामूल्य धनादेश अर्थात चेकबुक मिळणार आहे.
1 जुलैपासून हे नियम बदलणार :
– आयडीबीआय बँक ग्राहकांना आता दर वर्षात केवळ 20 पानांचं चेकबुक मोफत मिळणार. त्यानंतर प्रत्येक चेकसाठी त्यांना ५ रुपये शुल्क द्यावे लागणार.
– रोख रक्कम (होम आणि नॉन होम) जमा करण्यासाठी, विविध बचत खात्यांसाठी अर्ध-शहरी आणि ग्रामीण शाखांकरिता दरमहा मोफत सुविधांची संख्या कमी करुन अनुक्रमे 7 आणि 10 वरून ५ केली आहे.
– सुपर सेव्हिंग प्लस खात्यांसाठी अर्ध-शहरी व ग्रामीण भागातील विनामूल्य व्यवहार आताच्या अनुक्रमे 10 आणि 12 च्या तुलनेत आता प्रत्येक 8 असतील.
– ज्युबिलीप्लस ज्येष्ठ नागरिक खातेदारांच्या खात्यामध्ये मासिक सरासरी शिल्लक 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर लॉकर दरात कोणतीही सूट मिळणार नाही.