टिओडी मराठी, दि. 18 जुलै 2021 – बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये निर्धारीत मर्यादेपेक्षा अधिक खर्च केला आहे, असा आरोप केला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर एक याचिका देखील दाखल केली आहे. शिवसेनेचे सुनील खराटे आणि सुनील भालेराव यांनी ही याचिका दाखल केलीय. याच्या सुनावणीनंतर न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावून चार आठवड्याच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.
आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. रवी राणा यांनी विजय मिळवल्यानंतर निवडणूक निरीक्षक समितीने त्यांनी केलेल्या खर्चाचा ताळेबंद तपासला आहे.
याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की, आयोगाच्या अधिकाऱ्यांना त्यांना दिसून आले की 26 लाख रुपयांची मर्यादा असताना राणा यांनी 41 लाख 88 हजार रुपये खर्च केलेत.
रवि राणा यांनी मर्यादेपेक्षा अधिक खर्च केल्याने त्यांचा विजय रद्द घोषित करावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केलीय. या याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील चक्रे आणि अनिल किलोर यांच्यासमोर झाली आहे.