मुंबई : दसरा मेळावा आमचाच होईल अशी वक्तव्य दोन्ही गटाकडून करण्यात येत होती. त्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने पोलिसांकडून अहवाल दिला होता आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दोन्ही गटांचे अर्ज मुंबई महानगरपालिकेने नाकारले होते. त्यानंतर शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरे गटाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. पुढे सदा सरवणकर यांनी देखील हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. त्यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्यासह मुंबई महापालिका अशा तीनही बाजूंच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली आणि कोर्टासमोर युक्तिवाद केला. ही सुनावणी पार पडल्यानंतर निकालपत्राचे वाचन सुरू झालेले आहे. आणि स्थानिक आमदार शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांची याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
शिंदे गटाचे नेते आमदार सदा सरवणकर (Sada Saravankar) यांची याचिका फेटाळल्यानंतर हा शिंदे गटाला हायकोर्टाचा धक्का मानला जातो. मात्र उद्धव ठाकरे यांच्या गटाला परवानगी मिळणार का? याबद्दल अजूनही हायकोर्टाने निकाल दिलेला नाही. मात्र निकाल पत्राचे वाचन करत असताना हायकोर्टाने काही महत्त्वपूर्ण टिप्पणी केलेल्या आहेत. ज्यामध्ये मुंबई महापालिकेला दोन्ही बाजूंच्या दाव्यांची कल्पना होती. त्याबरोबरच पालिकेचा निर्णय वास्तविकतेला धरून नाही असे देखील कोर्टाकडून म्हणण्यात आलंय.
हायकोर्टाने खालील प्रमाणे काही महत्त्वाच्या टिप्पणी दिलेल्या आहेत.
● सरकारकडून शिवाजी पार्कवर 45 दिवस कार्यक्रमांसाठी राखीव
● शिवाजी पार्कवर दसरा मेळावा अनेक वर्ष होतो
● ठाकरे गटाकडून दोन अर्ज केले, ते त्याच दिवशी पालिकेला मिळाले
● 21 तारखेला याचिका दाखल करण्यात आली
● पत्र मिळाल्याच्या दिवशी पोलिसांकडून अहवाल
● पालिकेकडून उत्तर नसल्याने हायकोर्टात धाव
● 21 तारखेपूर्वी पालिकेने का निर्णय घेतला नाही?
● खरी सेना कोणाची? हा मुद्दा आज नाही
● तो विषय सुप्रीम कोर्टाकडे प्रलंबित
● या निकालाचा त्या सुनावणीवर परिणाम होणार नाही
● पालिकेचा निर्णय वास्तविकतेला धरून नाही
● पालिकेला दोन्ही बाजूंच्या दाव्यांची कल्पना होती
● दादर पोलिसांचे संख्याबळ पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न
अशा महत्त्वाच्या टिपणी हायकोर्टाकडून मांडण्यात आल्या आहेत.